नाशिक

Nashik | फसवणूक झालेल्या युनियनच्या खातेदारांना पैसे मिळाले परत

अंजली राऊत

मनमाड : पुढारी वृत्तसेवा – युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या घोटाळाप्रकरणी आमदार सुहास कांदे यांनी आक्रमक भूमिका घेऊन बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करताच बँक प्रशासनाकडून फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवी ठेवणाऱ्या ज्या खातेदारांची फसवणूक झाली होती त्या खातेदारांना त्यांची रक्कम परत देण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि.30) आ. कांदे यांच्या हस्ते सात खातेदारांना सुमारे 20 लाख रुपये देण्यात आले. आतापर्यंत 125 खातेदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

युनियन बँकेच्या शहर शाखेत बँकेत विमा कंपनीचा सेल्स ऑफिसर संशयित संदीप देशमुख याने बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवणाऱ्या शेकडो खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यात देशमुख यास अटकही झाली आहे. मात्र, एवढा मोठा घोटाळा बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय होऊच शकत नाही, असा करत आ. कांदे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी बँकेतील 8 अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर बँक प्रशासनाकडून खातेदारांना त्यांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला असून, खातेदारांची यादी तयार केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 125 खातेदारांची साडेसात कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे उघड झाले आहे. पैकी गुरुवारी वर्षा माकुने, अनिता कोळपे, बाजीराव गंडाक्षे, अलका काळे, गयाबाई झाल्टे, श्रीराम लहाने आणि विमल बेलेकर या सात खातेदारांचे सुमारे 20 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित खातेदारांचेदेखील टप्प्याटप्प्याने पैसे दिले जाणार असून, न्याय मिळवून देण्याची ग्वाही यावेळी आ. कांदे यांनी खातेदारांना दिली आहे. यावेळी फरहान खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे, बबलू पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, गंगाभाऊ त्रिभुवन, पिंटू सिरसाट, योगेश इमले यांच्यासह बँक अधिकारी, खातेदार उपस्थित होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT