दिंडोरी : नाशिक- दिंडोरी रस्त्याच्या कडेला असलेल्या याच नाल्यात अपघातग्रस्त कार पडल्याने गुदमरून सात जणांचा बळी गेला आहे.  Pudhari News Network
नाशिक

Nashik Accident Update : अरुंद दिंडोरी-वणी रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; सात बळी

अपघातांचे सत्र थांबेना; रखडलेल्या चौपदरीकरणावर संताप

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी (नाशिक) : नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यावर अनेकदा मोठे अपघात झाले असून, त्यात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

मात्र, प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे या रस्त्याचे काम रखडले असून, प्रवाशांचा जीव रोज धोक्यात येतो आहे. बुधवार (दि. १६) मध्यरात्री दिंडोरी शहराजवळ झालेल्या कार-दुचाकी अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून अजून किती बळीनंतर रस्त्याचे चौपदरीकरण होणार असा सवाल विचारला जात आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील अनेक रस्त्यांच्या कामांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र भाविकांची, पर्यटकांची आणि स्थानिकांची वर्दळ असलेल्या नाशिक-दिंडोरी रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्षच झाले आहे. राज्यभरातून भाविक दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्र व नांदुरी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येतात, तसेच अनेक जण सापुतारा येथे पर्यटनासाठी जातात. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण आवश्यक असल्याची मागणी वारंवार होत आहे.

Nashik Latest News

सध्या केवळ नाशिक ते अक्राळे फाटा या टप्प्याचा चारपदरी रस्ता मंजूर झाल्याचे प्रशासनाचे अधिकारी सांगतात. मात्र, अक्राळे ते वणी हा रस्ता हायब्रिड एन्युटी मॉडेल (Hybrid Annuity Model) योजनेत असल्यामुळे, त्या रस्त्याची मुदत 2031 पर्यंत असल्याने या मार्गासाठी शासन निधी मंजूर करत नाही. त्यामुळे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागानेदेखील या रस्त्याकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. दिंडोरी शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. मात्र, संबंधित कंपनीने अद्याप कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. मागील काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या दुतर्फा काम करत असताना, जिथे नुकताच अपघात झाला त्या ठिकाणच्या खड्ड्यातूनच मुरूम उकरून साईडपट्ट्या भरल्या होत्या. जर त्या खड्ड्याची योग्य देखभाल केली असती, तर कदाचित आजचा अपघात टाळता आला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासन, संबंधित कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा जीव रोज धोक्यात सापडत आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यातील अपघातांसाठी जबाबदार कोण? असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.

तीव्र वळणे ठरताहेत धोकादायक

नाशिक-दिंडोरी-वणी रस्त्यावर अनेक ठिकाणी तीव्र वळणे असून, त्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. अशा ठिकाणी सूचना फलक लावणे, संकेतचिन्हांची स्पष्ट मांडणी करणे ही प्राथमिक सुरक्षाव्यवस्था असायला हवी, मात्र तीही दिसून येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT