नाशिक : मनमाड-नांदगाव रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या इलेक्ट्रीक पोलवर शिवजयंतीसाठी क्रेनवरून झेंडे लावत असताना काळाने घाला घातला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवजयंती निमित्त पोलवर झेंडे लावताना घटना घडली.
मनमाडच्या नांदगावं मार्गावर ट्रकने हायड्रॉ क्रेनला जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून अजय पवार आणि चार्ल्स फ्रांसिस अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात इतर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
शिवजयंती निमित्त हायड्रॉ क्रेनवर चढून हे तरुण पथदीपच्या खांबावर झेंडे लावत असताना ट्रकने क्रेनला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की क्रेनचे दोन भाग झाले, त्यावर चढलेले तरुण खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशामन दलाचे अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तात्काळ जखमींना मदत करण्यात आली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे पाठवण्यात आले. अपघात स्थळी व शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झाली असून या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.