भरधाव तवेराच्या धडकेत निफाडचे तीन तरुण ठार pudhari photo
नाशिक

Nashik Accident | भरधाव तवेराची धडक ; दुचाकीवरील तिघे ठार

पुढारी वृत्तसेवा

वणी - वणी येथून निफाड तालुक्यातील कारसुल येथे जाणाऱ्या दुचाकीला अनियंत्रित वेगात असलेल्या तवेरा कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे ठार झाले असून शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. वणी - पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ हा अपघात झाला. मंगेश रमेश हिलीम (वय 23), विजय रमेश हिलीम (वय 16), गौरव तुकाराम पवार (वय 20) सर्व राहणार कारसुळ, तालुका निफाड हे तिघेही युवक MH15 BA-2229 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन वणी येथून कारसुळ येथे शुक्रवारी रात्री च्या सुमारास जात असताना मागाहुन भरधाव वेगात MH 19 -AP - 9933 या क्रमांकाची तवेरा कार भरधाव वेगात आली व या कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, यात दुचाकीवरील तिघेही ठार झाले.

कारचालक फरार 

अपघातानंतर तवेरा कारचालक फरार झाला. अपघाताची माहीती मिळताच परिसरातील नागरिक व पोलिस घटनास्थळी पोहचले. दरम्यान या तीन युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान तवेरा कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद माधव पवार रा. कारसुळ यांनी याबाबत वणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT