देवळा ; राष्ट्रीय मुंबई–आग्रा महामार्गावर पुन्हा एकदा वेगाच्या बेफिकीरीचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे. देवळा तालुक्यातील चिंचवे शिवारात शनिवारी (दि. २७ ) रोजी सकाळी भरधाव वेगात येणाऱ्या ब्रिझा कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेला चार वर्षांचा नातू जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास चिंचवे शिवारातील जिओ पंपाजवळील डिव्हायडर परिसरात हा अपघात घडला. मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणारी ब्रिझा कार (क्र. MH 19 CU 4526) हिने मोटारसायकल (क्र. MH 41 AV 4207) ला धडक दिल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार कारचा वेग जास्त असल्याची चर्चा होती.
या अपघातात चिंचवे येथील रहिवासी जिभाऊ दादाजी पवार आणि त्यांच्यासोबत असलेला त्यांचा चार वर्षांचा नातू रस्त्यावर फेकले जाऊन जखमी झाले. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी बजरंग रुग्णवाहिकेला संपर्क साधला व जखमींना उपचारासाठी चांदवड येथे हलविण्यात आले.
अपघातानंतर कार थांबविण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक आणि कारमधील चालक व महिलेमध्ये शाब्दिक वादही झाल्याची माहिती समोर आली. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच देवळा पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील, नितीन बाराहाते आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.
अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून , पोलिसांच्या समन्वयातून संबंधित कारचालकाने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत काही आर्थिक मदत केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, कारमधील चालक व महिलेने वाहन अतिवेगात नव्हते, आम्ही सतत हॉर्न वाजवत होतो मात्र दुचाकीस्वारांच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले .
या घटनेनंतर वारंवार अपघात घडणाऱ्या या ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महामार्गावरील वेगाचा खेळ थांबला नाही तर पुढचा बळी कोणाचा?” असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला.दरम्यान, वाहन चालकांनी वेगाची मर्यादा पाळावी व बेशिस्त वाहनचालना टाळावी, असे आवाहन देवळा पोलिसांनी केले आहे.