देवळा (नाशिक): देवळा तालुक्यातील रणादेव पाडे (बच्छाव वाडी) येथे मंगळवारी (दि. ६) दुपारी एक भीषण अपघात घडला. ज्ञानेश्वर शामराव बच्छाव (वय ४१) या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर उलटून त्याखाली दबून मृत्यू झाला. देवळा पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर बच्छाव हे शेतात नांगरणीचे काम आटोपून ट्रॅक्टरने घरी परतत होते. मंगळवार (दि.6) रोजी दुपारी दीडच्या सुमारास नाल्याच्या कडेला असलेल्या अरुंद रस्त्यावरून जात असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर थेट नाल्यात उलटला. या अपघातात ज्ञानेश्वर ट्रॅक्टरखाली दबले गेले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. ज्ञानेश्वरच्या अचानक निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी असलेल्या अरुंद रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.