नाशिक : आडगाव टी पॉईंट येथे गतीरोधकामुळे वेग कमी केलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव आलेले पिकअप वाहन आदळून मोठा अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. भुसावळ येथे विवाह सोहळ्यासाठी जाताना हा अपघात झाला असून मृतात नियोजित वधुच्या आईचा समावेश आहे.
ममतादेवी प्रेमकुमार मोदणवाल (५४, रा. नालासोपारा, मुळ रा. उत्तरप्रदेश) व समाधान संतोष सोनवणे (रा. नालासोपारा) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, नालासोपारा येथील मोदणवाल कुटूंबिय विवाहानिमित्त भुसावळ येथे जात होते. त्यासाठी मोदणवाल कुटूंबियांनी एमएच ४८ डीसी २४६१ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून सोमवारी (दि. ७) मध्यरात्री १२.३० वाजता नालासोपारा येथून भुसावळला निघाले. पहाटेच्या सुमारास आडगाव टी पॉईंट येथे आल्यानंतर हा अपघात झाला. गतीरोधकामुळे एमएच ११ एएल ७८७९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने ट्रकचा वेग कमी केला. त्यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या पिकअपचालकास पिकअपचा वेग नियंत्रीत करता आला नाही. त्यामुळे पिकअप ट्रकवर जाऊन आदळली. त्यात ट्रकचालक सोनवणे यांच्यासह ममतादेवी मोदणवाल यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप वाहनातील १४ पैकी ५ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या अपघातात श्रेया प्रेमकुमार मोदनवाल (१४), अभिनंदन अशोक मोदनवाल (१०), अंश अशोक मोदनवाल (१३) पिंकीदेवी अशोक मोदनवाल (४०) व वरुण अशोक मोदनवाल (१६, सर्व रा. नालासोपारा) हे जखमी झाले आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदनवाल कुटूंबियांना भुसावळ येथे नियोजित स्थळी सकाळी दहापर्यंत पोहचायचे होते. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री वाहनाने भुसावळ गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र, कमी वेळेत जास्त अंतर कापण्याच्या नादात वेगाने वाहन चालवणे दोघांच्या जीवावर बेतल्याची चर्चा रुग्णालयात होती.