नाशिक : शहरातील द्वारका सर्कल ट्रॅव्हल्स लाईन सर्विस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात गौतम भगवान अंभोरे (वय 35) या नागरिकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे. पारीख ट्रॅव्हल्सच्या बसच्या धडकेमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत अंभोरे पत्नी व मुलासोबत सर्विस रोडवर द्वारका सर्कल येथे उभा होता, त्यावेळी पारिख ट्रॅव्हलच्या भरधाव बसने त्यांना धडक दिली व यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात घडला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. द्वारका सर्कल परिसरात नेहमीच तीव्र वाहतुक कोंडी निर्माण होते. त्यातच संध्याकाळच्या वेळी अवैध ट्रॅव्हल्स बस आणि त्यांच्या अड्ड्यांमुळे वाहतुकीची परिस्थिती अधिक बिकट बनत जात आहे. या परिसरात ट्रॅव्हल्सचालकांची दादागिरी आणि अनियमित पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांकडून आता द्वारका परिसरातील अवैध ट्रॅव्हल्स ऑफिसेस तातडीने हटवावीत आणि कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.