सातपूर (नाशिक) : परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि.११) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. नविका अभिषेक नेरकर (वय ८, रा. मयूर स्वीटच्या पाठीमागे, आनंदवली, पाईपलाईन रोड, सातपूर) असे मृत चिमुरडीचे नाव असून ती आपल्या आजीसोबत दुचाकीवरून जलतरणाच्या सरावासाठी विवेक येथे गेली होती.
दुचाकीला कट लागून आजी नात खाली पडल्या
सरावानंतर टीव्हीएस ज्युपिटर (एमएच १५ जेई ९१८१) या दुचाकीवरून आजीसोबत घरी परतत असताना एमआयडीसीतून पाठीमागून येणाऱ्या टाटा ट्रकचा (एमएच १७ बी डी ५०५) दुचाकीला कट लागला. त्यामुळे दुचाकीवरील तोल जाऊन आजी एकीकडे पडली. तर नविका ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून सातपूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे
गतिरोधक टाकण्याची मागणी
या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करत सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी केली. तसेच रस्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली. पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिनीच नविकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.