नाशिक

Nashik accident | वणी–कळवण रस्त्यावर भीषण अपघात; कार नाल्यात कोसळली, 5 भाविक जखमी

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने पुलाचा कठडा तोडला आणि थेट खाली नाल्यात कोसळली

पुढारी वृत्तसेवा

वणी : सप्तशृगी गडावरून देवीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या कारला दि. ३१ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. वणी–कळवण मार्गावरील अहिवंतवाडी शिवारात झालेल्या भीषण अपघातात सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात 5 भाविक जखमी झाले. अपघातानंतर कारने पुलाचा कठडा तोडून खाली नाल्यात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 15 KK 1696 क्रमांकाच्या कारमधून सहा जण वणीच्या दिशेने प्रवास करीत होते. अहिवंतवाडी परिसरातील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने पुलाचा कठडा तोडला आणि थेट खाली नाल्यात कोसळली. या अपघातात हर्षश्री आहेर (वय ४२), देवदास आहेर (वय ४७), पुष्कर आहेर (वय १७), गौरव आहेर (वय १३) आणि धोंडाबाई वाळुंज (वय ६८), सर्व रा. निफाड हे जखमी झाले. काही जखमींच्या डोक्याला मार लागला असून काहींना हात व पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढून मदतकार्य केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार वसंत साबळे करीत आहेत.

दरम्यान, नांदुरी–वणी मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला साईड पट्ट्यांचा अभाव असून विशेषतः पुलांजवळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करून अपघातप्रवण ठिकाणांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT