चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील श्री रेणुकामाता मंदिराजवळील घाटात सोमवारी (दि. 9) दुपारी विचित्र अपघात झाला. प्लास्टिकचा कच्चा माल घेऊन निघालेल्या ओव्हरलोड मालट्रकचे ब्रेक फेल होऊन, तो अचानक मागे येऊन जवळून जाणाऱ्या दुचाकीवर उलटला. त्यावरील दुचाकीस्वार दबून जागीच ठार झाला. याप्रकरणी ट्रकचालक जिहा उल्हक (32, रा. मालेगाव) याच्याविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राहुड येथील एकनाथ शंकरराव पवार (75) हे सोमवारी कामानिमित्त दुचाकीने (एमएच 15, एचई 4951) चांदवडला आले होते. काम आटोपून दुपारी 2 च्या सुमारास ते मुंबई-आग्रा महामार्गाने राहुडला चालले होते. श्री रेणुकादेवी माता मंदिराजवळील घाटमाथ्यावर दुचाकीसमोर धावत असलेला मालट्रक (एम. एच. 18, ए. ए. 6299) ब्रेक फेल होऊन अचानक मागे येऊ लागला. काही समजण्यापूर्वीच मालट्रक पवार यांच्या दुचाकीवर येऊन आदळला. पवार यांचा चिरडून मृत्यू झाला.
चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमा टोलवेजच्या पथकाला पाचारण करण्यात आले. क्रेन बोलाविण्यात आली. अपघातग्रस्त ट्रकमध्ये संपूर्ण माल भरलेला असल्याने ट्रकखाली दबलेल्या व्यक्तीला काढणे शक्य होत नव्हते. तेव्हा अजून एक क्रेन बोलवण्यात आली. तोपर्यंत नागरिकांनीही मालट्रकमधील गोण्या बाजूला केल्या. दोन क्रेनच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक उचलून पवार यांचे शव बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सहा मुली, नातू, भाऊ असा परिवार आहे. अपघातप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार स्वप्निल जाधव तपास करीत आहेत.
मालेगावकडे जाणारा मालट्रक महामार्गावर उलटा झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी जलकुंभ ते इच्छापूर्ती मंदिर या दरम्यान महामार्गाच्या एका बाजूने दुहेरी वाहतूक करण्यात आली होती. ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.