दिंडोरी: नाशिक- पेठ महामार्गावरील चाचडगावजवळ रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार शेतकऱ्याला गुजरातकडून येत असलेल्या खासगी प्रवासी बसची धडक बसून शेतकरी जागीच ठार झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाचडगाव येथील शेतकरी रमेश रामचंद्र पैलमाले (50) हे दुचाकीवरून धाऊरकडून चाचडगाव रस्त्याकडे चालले होते. करंजाळी येथील आठवडे बाजारासाठी ते निघालेले होते. रस्ता ओलांडत असताना गुजरातकडून आलेल्या बस (एआर 06, बी 7797) ने दुचाकीवरून चाललेल्या रमेश रामचंद्र पैलमाले (50) यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. त्याच्यासमवेत असलेले उमराळे बुद्रुक येथील चिंतामण जयवंत पगारेंच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर लीलाबाई जयवंत पगारे यांच्या डोक्याला मार लागला. या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. घटनास्थळी पोलिस नाईक संजय गायकवाड, कॉन्स्टेबल पवार, साबळे आदींनी भेट देत पंचनामा केला.