नाशिक

Nashik Accident : मुळूबाई घाटात दुधाचा टँकर ५० फूट दरीत कोसळला; २५ हजार लीटर दूध गेले वाहून

चालक थोडक्यात बचावला

पुढारी वृत्तसेवा

नगरसूल : येवला–नांदगाव राज्य महामार्ग क्रमांक २५ वरील मुळूबाई घाटात बुधवारी सकाळी दुधाने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्ता ओला झाला होता. त्यातच घाटात टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्यालगतचे लोखंडी संरक्षक कठडे तोडून सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात टँकरमधील २५,००० लीटर दूध जवळच असलेल्या शेतात वाहून गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर टँकर नांदगावहून येवल्याकडे येत असताना हा अपघात घडला. दरीत कोसळताना टँकरने दोन पलट्या घेतल्यामुळे 'MH 16 CE 9595' या क्रमांकाच्या १२ चाकी टँकरचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात इतका भीषण होता की टँकरची चेसिस पूर्णपणे पिळून निघाली असून अनेक टायरही निखळले आहेत. यामुळे टँकर पूर्णपणे निकामी झाला आहे.

अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी टँकरच्या केबिनमध्ये गंभीर अवस्थेत अडकलेल्या चालकाला शिताफीने बाहेर काढले. सुदैवाने या भीषण अपघातात चालक थोडक्यात बचावला असून त्याचे प्राण वाचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT