सानवी सागर गवई (वय ५)  pudhari news network
नाशिक

Nashik Accident | सिटीलिंक बस अपघाताच्या चौकशीचे आदेश

मृत चिमुकलीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसाठी बस ऑपरेटरला सूचना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : बसखाली चिरडून शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सिटीलिंक प्रशासनाने दिले आहेत. मृत मुलीच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई अदा करण्याच्या सूचनाही प्रशासनाने बस ऑपरेटर कंपनीला दिले आहेत. सिटीलिंकचे महाव्यवस्थापक (यांत्रिकी) बाजीराव माळी यांनी ही माहिती दिली आहे.

नाशिक रोड विभागातील मालधक्का रोडवरील सिटीलिंकच्या बस डेपोत शाळकरी मुलगी बसच्या चाकाखाली येऊन मृत पावल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१०) दुपारी दीडच्या सुमारास घडली. बस डेपोला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे लगतचे नागरिक बस डेपोतूनच ये-जा करीत असतात. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी आहे. त्यांची नात सानवी सागर गवई (वय ५) ही तिच्या आजोबांसमवेत शाळेतून चहाच्या टपरीवर जात असताना हा अपघात घडला.

सदर घटनेनंतर बसचालक फरार झाल्याने संतप्त जमावाने बसची तोडफोड केली. नुकसानभरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून केली गेली. सदर प्रकरणानंतर सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यानंतर या अपघाताच्या चौकशीचे आदेश सिटीलिंक प्रशासनाने दिले आहेत. मृत चिमुकलीच्या कुटुंबीयांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याच्या सूचना यावेळी सिटीलिंक प्रशासनाने बस ऑपरेटर्सला दिल्या आहेत.

नाशिक रोडला बस डेपोत पाचवर्षीय चिमुकली बसखाली सापडून मृत झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले असून, मृत मुलीच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात बस ऑपरेटर कंपनीला सूचित करण्यात आले आहे.
बाजीराव माळी, महाव्यवस्थापक (यांत्रिकी), सिटीलिंक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT