वजन कमी करण्याच्या बहाण्याने वकील महिलेकडून उकळले पैसे File Photo
नाशिक

Nashik | वजन कमी करण्याच्या बहाण्याने वकील महिलेकडून उकळले पैसे

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : एका तोतया डॉक्टरने महिला वकिलास वजन कमी करण्याच्या बहाण्याने तिला व्हिडिओ कॉल करून त्यावरून चित्रीकरण करीत व फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयित नीलेश अशोक पगार ऊर्फ नील पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला वकिलाशी संशयिताने संपर्क साधला. आपण डॉक्टर असल्याची बतावणी करून वजन कमी करण्यासाठी उपचार करू असे सांगितले. त्याने उपचाराच्या बहाण्याने महिला वकिलास व्हिडिओ कॉल केला. त्यावरून त्याने महिलेचे चित्रीकरण व फोटो काढले. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने महिला वकिलाकडून चार लाख २४ हजार रुपये घेतले. त्यापैकी ३ लाख ४४ हजार रुपये परतही केले. दरम्यान, महिलेस नीलेश हा तोतया डॉक्टर असल्याचे समजल्यानंतर तिने त्याच्यासोबत संपर्क टाळला. मात्र, त्याने मोबाइलवरून महिलेचा पाठलाग करून तिला त्रास दिला. मंगळवारी (दि. २४) दुपारच्या सुमारास संशयिताने महिला वकिलाच्या कार्यालयात जाऊन पुन्हा तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर महिलेचे चोरून काढलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत फिर्याद नोंदवली.

संशयिताविरोधात दुसरा गुन्हा

संशयित नील पाटील याने तो स्वत: डॉक्टर असल्याचे भासवत महिलांना फसवल्याचे समोर येत आहे. याआधीही इंदिरानगर येथील महिलेस उपचाराच्या बहाण्याने व्हिडिओ कॉल करून तिचे चित्रीकरण व फोटाे काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत संशयिताने पीडितेकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. पीडितेस वारंवार फोन, मेसेज करून तिचा पाठलाग केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नीलविरोधात गुन्हा दाखल आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT