गालाला आणि पायाला काटे टोचलेले काटेरी झुडपात आढळले एक दिवसाचे अर्भक. pudhari news network
नाशिक

Nashik | मालेगावमध्ये काटेरी झुडपात आढळले एक दिवसाचे अर्भक

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : तालुक्यातील कळवाडी फाटा परिसरात नुकतेच जन्माला आलेले पुरुष जातीचे अर्भक कापड्यात गुंडाळून काटेरी झुडपात टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. स्थानिक दाम्पत्याने प्रसंगावधान राखत त्या बालकरला झुडपातून काढत कळवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. या बालकाला मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा, अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे काही ठिकाणी मुलगी जन्माला आल्यानंतर निर्दयपणे त्या लहानशा नकोशीला टाकून देण्यात येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत असतानाच दुसरीकडे नुकतेच जन्माला आलेले पुरुष जातीचे अर्भक कापड्यात गुंडाळून काटेरी झुडपात टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

कळवाडी परिसरात असलेल्या पांझण डावा कालव्यालगत सोमवारी (दि. २३) दुपारी भर उन्हात काटेरी झुडपांमध्ये लहान बाळाच्या रडण्याचा आवाज रस्त्याने जाणाऱ्या दाम्पत्याला आला. त्यांनी झुडपांमध्ये पाहिले असता कापडात नुकतेच जन्माला आलेले पुरुष जातीचे बाळ होते. ते बाळ पाहताच दाम्पत्याला धक्काच बसला. त्यांनी तातडीने बाळाला बाहेर काढत त्याला कळवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले. या ठिकाणी डॉ. पूनम जाधव यांनी नवजात अर्भकावर उपचार सुरु केल्याने बाळाचे प्राण वाचले आहे. ही घटना गावात कळताच स्थानिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. निर्दयी मातेने बाळाला घरीच जन्म दिल्यानंतर असे वैरी होऊन काट्यांमध्ये टाकून दिल्याने ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून, या मातेचा शोध सुरू आहे. याबाबत मालेगाव तालुका पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर त्यांनी रुग्णालयात भेट देत माहिती जाणून घेतली.

कळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला आणल्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केले, त्याच्या गालाला आणि पायाला काटे टोचलेले होते. उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर आहे. हे बाळ सोमवारीच (दि. २३) जन्माला आलेले असून, बाळाचा जन्म घरीच झालेला आहे. त्याला मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
डॉ. पूनम जाधव, प्राथमिक आरोग्य अधिकारी, कळवाडी, मालेगाव.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT