नाशिक : तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांचा २४ सेकंदाचा व्हिडीओ व्हॉट्सअपवर व्हायरल करून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
एप्रिल २०२२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धार्मिक स्थळांवरील भोंग्याविरोधात आंदोलन छेडण्यात आले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त पांडेय यांनी एका वृत्तवाहिनीस मुलाखत दिली होती. ४ मिनिट ४२ सेकंदाची ही मुलाखत असताना अज्ञात व्यक्तीने या व्हिडीओत छेडछाड केली. तसेच मुस्लिम धर्मियांच्या दिवसभरातील पाच वेळच्या अजानच्या १५ मिनिटांपूर्वी व १५ मिनिटे नंतर धार्मिक स्थळाच्या १०० मीटर अंतरात वाद्य वाजवणे, हनुमान चालिसा पठन करण्यास बंदी असल्याचेच २४ सेकंदाच्या व्हिडीओत दाखवण्यात आले. हा व्हिडीओ व्हायरल करून दोन धर्मियात असुरक्षीततेची व द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. यामुळे व्हिडीओ एडीट करणाऱ्यासह तो फॉरवर्ड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. तसेच नागरिकांनी हा व्हिडीओ कोणत्याही सोशल मीडिया माध्यमांमध्ये व्हायरल करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.