नाशिक : आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक विभागाकडून विभागातील नऊ हजार 647 शेतकर्यांकडून एक लाख 36 हजार 170 मेट्रिक टन अर्थात 93 टक्के धानखरेदी पूर्ण करण्यात आली. या खरेदीचा चुकारा महामंंडळाकडून देण्यात येत असून, आतापर्यंत 23 कोटी 52 लाख रुपये शेतकर्यांना अदा करण्यात आले आहेत. ही रक्कम एकूण चुकारा रकमेच्या 75.50 टक्के इतकी आहे.
रब्बी हंगामात शेतकर्यांना हमीभाव मिळावा यासाठी आदिवासी विकास महामंडळाकडून दरवर्षी धानखरेदी करण्यात येते. नाशिक विभागातील सुरगाणा 11, पेठ 8, दिंडोरी 3, कळवण 5, घोटी 4 अशा एकूण 31 ठिकाणी धानखरेदी सुरू आहे. यंदा 31 मार्चपर्यंत ही धान खरेदी सुरू राहणार आहे. धान खरेदी योजनेसाठी 25 हजार 157 शेतकर्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. त्यापैकी नऊ हजार 647 शेतकर्यांनी धान दिले. या शेतकर्यांना त्यांच्या धान्याचा चुकारा डीबीटी तत्त्वावर पीएफएमएस प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
धान खरेदी केंद्र
सुरगाणा - 11
पेठ - 8
दिंडोरी - 3
कळवण - 5
घोटी - 4
एकूण 31
शासनाने यंदा धानखरेदीसाठी महामंडळाला एक लाख 46 हजार मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यापैकी एक लाख 36 हजार 170 मेट्रिक टन खरेदी पूर्ण झाली आहे. धानखरेदीचा चुकारा 29 कोटी 80 लाख 93 हजार 616 इतका देणे बाकी आहे. त्यापैकी 23 कोटी 52 लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. या अगोदर 13 कोटी रुपये अदा करण्यात आले असून, बुधवारी (दि. 19) नऊ कोटी 72 लाख रुपये शासनाने महामंडळाच्या खात्यावर वर्ग केले आहेत. हे पैसे शेतकर्यांना डीबीटी तत्त्वावर पाठविण्यात आले आहेत. एकूण देय रकमेपैकी 75.50 टक्के रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.