उद्योग विभागातर्फे नाशिक सातपूर येथील एका हाॅटेलमध्ये आयोजित 'उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी' या कार्यक्रमात ते बोलत होते. file photo
नाशिक

Nashik | डिसेंबरपर्यंत नाशिकला आठ हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री उदय सामंत

डिफेन्स, ऑटो इंडस्ट्रीचा राहणार सहभाग; नाशिकसह नागपूर, शिर्डी, पुणे, रत्नागिरीत डिफेन्स क्लस्टर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : मॅग्नेटिक महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत नाशिकला गुंतवणूक देण्याचा राज्य शासनाचा विचार असून, त्या दृष्टीने बोलणी सुरू आहे. डिसेंबरपर्यंत डिफेन्स किंवा ऑटो इंडस्ट्रीमधून तीन ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक नाशिकमध्ये येणार आहे. एका डिफेन्स कंपनीशी याविषयी ८० टक्के चर्चा झाली आहे. राज्यात नागपूर, शिर्डी, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार असल्याने नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्रातील कंपन्या येण्यास उत्सुक असल्याने नाशिकमध्ये पुढील अँकर इंडस्ट्री म्हणून संरक्षण क्षेत्रातील कंपनी असेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

उद्योगमंत्र्यांच्या घोषणा...

  • - उद्योगांच्या वाढीव घरपट्टीबाबत आचारसंहिता लागण्याच्या आत निर्णय

  • - कोकणातील मँगो, काजू पार्कच्या धर्तीवर जिल्ह्यात कृषिप्रक्रिया प्रकल्प आणणार

  • - उद्योगांना वीजजोडणी देणे सुलभ व्हावे, यासाठी औद्योगिक महामंडळ उपकेंद्रासाठी जागा देणार

  • - जिल्ह्यात पायाभूत सुविधांची ३१७ कोटींची कामे सुरू करणार

उद्योग विभागातर्फे सातपूर येथील एका हाॅटेलमध्ये आयोजित 'उद्यमात सकल समृद्धी- महाराष्ट्राची उद्योग भरारी' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री सामंत यांनी उद्योग विभागाच्या मागील दोन वर्षांतील कामकाजाचा आढावा घेतला.

नाशिकला मोठा उद्योग आणण्याच्या उद्योजकांच्या मागणीला उत्तर देताना ते म्हणाले, नाशिकला अपेक्षेपेक्षा मोठा प्रकल्प दिला जाणार असून, संबंधितांशी ८० टक्के बोलणी पूर्ण झाली आहे. डिफेन्स क्लस्टरमध्ये नाशिकचा समावेश असल्याने डिफेन्सचा प्रकल्प येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. जोपर्यंत शासनाकडून इन्सेंटिव्ह निश्चित केला गेला जात नाही, तोपर्यंत कंपनीकडून होकार दिला जात नसल्यानेच कंपनीच्या नावाची घोषणा करीत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जेव्हा गुंतवणुकीबाबतची चर्चा पूर्ण होईल, तेव्हा संबंधित कंपनीच्या संचालकांनाच याबाबतची अधिकृत घोषणा करण्यासाठी नाशिकला पाठविणार असल्याचेही उद्योगमंत्री म्हणाले. तसेच वाहन क्षेत्रातील कंपनी आणण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी खासदार वाजे यांनी औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा यासह अन्य मागण्या मांडल्या. मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेकडेही त्यांनी लक्ष वेधले. निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांनी घरपट्टी, मोठी गुंतवणूक आदी प्रश्न मांडले. मंत्री सामंत यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या लाभार्थींना धनादेश व नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले. औद्योगिक महामंडळाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, निमाचे सचिव निखिल पांचाळ, संजय सोनवणे, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, अधीक्षक अभियंता बाळासाहेब झंजे, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

महिंद्रा गुंतवणूक करणार

महिंद्रा कंपनीने नाशिकला गुंतवणूक करावी, या उद्योजकांच्या मागणीची दखल घेताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, गेल्या महिन्यातच आनंद महिंद्रा यांच्याशी बोललो असून, ते नाशिकमध्ये गुंतवणूक करणार आहेत.

विरोधकांना टोला

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे फेक नॅरेटिव्ह विरोधकांकडून पसरवले जात असून, त्यात तथ्य नाही. याबाबत श्वेतपत्रिका काढली असता, त्यावर विरोधकांनी अवाक्षरही उच्चारले नाही. उलट गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रात ७५ हजार कोटींची गुंतवणूक आली असून, परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचेही सामंत म्हणाले.

तर बँक व्यवस्थापकावर गुन्हा

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत दोन वर्षांत ३२ हजार ७०० उद्योजक तयार करण्याचे काम आम्ही केले आहे. अर्थात हा आकडा मोठा होऊ शकतो. परंतु बँकांकडून अद्यापही नवउद्योजकांना कर्जासाठी सहकार्य केले जात नाही. याबाबत कोणी धाडस करून बँकेविरोधात पोलिसांत तक्रार केल्यास, बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होईल, असेही उद्योगमंत्री सामंत म्हणाले.

उद्योगमंत्र्यांचा पायगुण, वाजेंची नियुक्ती

खासदार राजाभाऊ वाजे यांची केंद्रीय उद्योग विभागाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची बाब कार्यक्रमस्थळी सांगितली गेली. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संधी साधत माझ्या पायगुणामुळेच नियुक्ती झाल्याचे आवर्जून सांगितले. तसेच कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये गुफ्तगू रंगल्याने, चर्चेला उधाण आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT