Shri Jagdamba Mata from Kotamgaon
कोटमगाव येथील श्री जगदंबा माता file photo
नाशिक

नाशिक : कोटमगाव तीर्थक्षेत्र विकासासाठी ७५ कोटींचा प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा माता तीर्थक्षेत्र विकास आराखडा ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करून या विकास आराखड्याला मान्यता देण्याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच या आराखाड्यास मंजुरी दिली जाणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत विधानभवन येथे झालेल्या बैठकीत तीर्थक्षेत्रस्थळी करण्यात येणाऱ्या विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन संचालक जयश्री भोज, ऑनलाइन नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने, सचिन कळमकर आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, कोटमगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असून, येथे शारदीय नवरात्रोत्सवात तसेच वर्षभर लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. काही मूलभूत सुविधांच्या अभावी भाविक व पर्यटकांना सुविधा मिळण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे या तीर्थस्थळी येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांसाठी विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७५ कोटी रकमेचे अंदाजपत्रक व आराखडा तयार केलेला असून, जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी समितीवर मंजुरी घेऊन प्रस्ताव ग्रामविकास विभागाला पाठविलेला आहे. हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरित करून या विकास आराखड्याला मान्यता मिळावी, अशी सूचना भुजबळ यांनी केली.

शिखर समिती बैठकीत ठेवण्याचे निर्देश

प्रस्तावित विकास आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मंजुरी मिळालेली असल्याने हा आराखडा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीमध्ये तसेच शिखर समिती बैठकीमध्ये ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

SCROLL FOR NEXT