नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी महापालिकेने ५० प्रमुख चौकांच्या सुधारणा व सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या चौकांचा कायापालट केला जाणार असून, त्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) अंतर्गत तब्बल १७ कोटी १४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी असलेल्या निधीचा वापर चौकांच्या सुशोभीकरणासाठी केला जात असल्याने या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली असून, वाहनांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अपुऱ्या वाहतूक नियोजनामुळे वाहनचालकांसह पादचारी आणि सायकलस्वारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर ५० प्रमुख चौकांचा सुधार आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक चौकातील वाहनांची वर्दळ, वाहनांचे प्रकार आणि वाहतुकीचे प्रमाण मोजले जाणार आहे.
त्यानंतर चौकांची पुनर्रचना, सिम्युलेशन मॉडेल तयार करणे आणि अंतिम नकाशानुसार सुधारणा करण्याचे नियोजन आहे. वाहतूक सिग्नल, पार्किंग व्यवस्था, पादचारी मार्ग आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील उपाययोजनांचाही आराखड्यात समावेश आहे.
या कामांसाठी 'एनकॅप'अंतर्गत १७ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, महापालिकेच्या महासभेने त्याला मंजुरी दिली आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून चौक सुशोभीकरणाची कामे केली जाणार असल्याने निधीच्या विनियोगावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
यापूर्वी त्र्यंबक रस्त्यावरील कामांसाठीही 'एनकॅप'मधून १० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते. या निधीतून नेमकी कोणती कामे झाली, याबाबत स्पष्टता नसताना आता आणखी १८ कोटी रुपये चौक सुधारणांसाठी खर्च केले जाणार आहेत.
सारडा सर्कल, चांडक सर्कल, आरटीओ कॉर्नर, त्रिमूर्ती चौक, सह्याद्री हॉस्पिटल चौक, साईनाथ चौफुली, अशोका स्कूल चौक, मनपसंद स्वीट चौक, ड्रीम कॅसल चौक, सैलानीबाबा चौक, पाइपलाइन रोड, आंबेडकर चौक (म्हसरूळ), महात्मानगर आरबीसी जंक्शन, जुना सायखेडा रोड, जेलरोड, माउली लॉन्स, मखमलाबाद नाका, सिम्बॉयसिस स्कूल चौक, वॉस्को चौक, दक्षिणमुखी हनुमान मंदिर (उंटवाडी), शरणपूर रोड, धनलक्ष्मी लॉन्स (संभाजीनगर), जयशंकर सर्कल, एक्स्लो पॉईंट,
आरडी सर्कल, नंदन स्वीट (कॉलेज रोड), कलानगर-वडाळा-पाथर्डी मार्ग, भारतनगर चौफुली, डीजीपीनगर-पेट्रोलपंप, वडाळा गाव, मार्केट यार्ड-दिंडोरी रोड, बारदान फाटा, जेहान सर्कल, उपनगर, काठे गल्ली सिग्नल, पेठ रोड मार्केट, दत्त चौक (नाशिकरोड), रिलायन्स पेट्रोलपंप, कंसारा माता चौक (म्हसरूळ), वेद मंदिर, कार्बन नाका, किलबिल स्कूल, ड्रीम सिटी-टाकळी रोड, संगम चौक, हिरावाडी सिग्नल आणि दुर्गा चौक आदी ठिकाणांचा समावेश आहे.