नाशिक : शहरातील मोकाट व भटक्या मृत जनावरांच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न महापालिकेने प्रभावीपणे सोडविला आहे. महापालिकेच्या विल्होळीस्थित घनकचरा प्रकल्पावरील डिझेल शवदाहिनीत मागील १३ महिन्यांमध्ये तब्बल १३ हजार ९६७ मृत जनावरांचे दहन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक ५,९८९ भटकी कृत्री व ५,०७१ पारड्यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाला मोठा हातभार लागला आहे.
शहरातील बाजारपेठा व गावठाण भागांत भटक्या जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. ही जनावरे रस्त्यांवर ठाण मांडून बसत असल्याने अनेकवेळा वाहन धडकेत अपघात घडतात. त्यात जनावरे जखमी होतात, प्रसंगी त्यांचा मृत्यू होतो. शहरात जनावरांच्या गोठ्यांची संख्याही अधिक आहे. अनेक वेळा गोठ्यात गायी, म्हशी मृत पावतात. प्रसूतीदरम्यानही वासरे - पारडे मृत होतात. अनेकवेळा मृत जनावरे उघड्यावर टाकून दिली जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. परिणामी, नागरी आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य व यांत्रिकी विभागाच्या समन्वयाने मृत जनावरांच्या विल्हेवाटीची योजना आखण्यात आली. यासाठी यांत्रिकी विभागामार्फत महापालिकेच्या विल्होळीस्थित घनकचरा प्रकल्पावर डिझेल शवदाहिनी बसविण्यात आली. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत मृत जनावरे आणून या शवदाहिनीत दहन केले जात आहे. त्यासाठी लिफ्ट व्हॅनदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणाऱ्या तसेच खासगी गोठ्यांमध्ये मृत झालेल्या जनावरांची प्रभावीपणे विल्हेवाट लावणे शक्य झाले आहे. एप्रिल २०२४ ते एप्रिल २०२५ या १३ महिन्यांच्या कालावधीत १३ हजार ९६७ मृत जनावरांची विल्हेवाट या पद्धतीने लावण्यात आली आहे.
या शवदाहिनीची क्षमता ३०० किलोग्रॅम प्रतितास इतकी आहे. शहरातील मृत जनावरे वेळेवर उचलली जाऊन त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याने नागरिकांना वास किंवा इतर त्रास होत नाही. ही मृत जनावरे उचलण्याची मोहीम नियमित सुरू असते.
मृत जनावरांमध्ये कुत्रे, मांजर, बैल आदी लहान - मोठ्या जनावरांचा समावेश असतो. शवदाहिनीत डिझेल वापरून जनावरांची विल्हेवाट लावण्यात येते. गेल्या १३ महिन्यांत १३,९६७ मृत जनावरांच्या विल्हेवाटीसाठी तब्बल १५ हजार २४९ लिटर डिझेल तसेच घनकचरा प्रकल्पात तयार होणाऱ्या 'आरडीएफ'चा वापर करण्यात आला आहे.
कुत्रे- ५,९८९, मांजरी- १,१४५, पारडे- ५,०७१, गायी- ११७३, डुकरे- २३३, बैल- ३९, म्हशी- २९२, घोडे- ४५, बकऱ्या- ३९, उंट- ३, गाढव- २.
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पावरील डिझेल शवदाहिनीत मृत जनावरांच्या विल्हेवाटीची व्यवस्था केली आहे. याद्वारे नागरी आरोग्य रक्षणाचे कार्य महापालिकेतर्फे केले जात आहे.बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग.