दिंडोरी (नाशिक) : विविध सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनी पाण्यावरचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक फॉर्म भरावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले. मोहाडी पाणी वापर संस्थेच्या वतीने वाघाड धरण येथे जलपूजन करण्यात प्रसंगी ते बोलत होते. यानंतर पाणी नियोजन बैठक मंत्री झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी खासदार भास्कर भगरे, आ. दिलीप बनकर, विकास प्राधिकरण अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, वाघाड कालवा उपविभागीय अभियंता निलेश वन्नरे उपस्थित होते.
मंत्री झिरवाळ म्हणाले की, एकदरे धरणाच्या पाण्यामुळे पेठ व दिंडोरी तालुक्यातील अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच नद्यांवरील साठवण बंधाऱ्यांचे निर्बंध उठविण्यासाठी प्रयत्न सुरू असून पाणी वाटप महासंघाने जागृत राहून शेतकऱ्यांना पाणी मिळवून द्यावे. पाण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुविधा निर्माण करण्यासाठी पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शिवार रस्ते विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पाणी वापर महासंघाचे संचालक शहाजी सोमवंशी यांनी विविध समस्या मांडत, दरवर्षी आकारली जाणारी १० टक्के पाणीपट्टी वाढ अन्यायकारक असून रद्द करवी. २० टक्के लोकल फंडाचा प्रत्यक्ष फायदा पाणी वापर संस्थांना मिळावा अशी मागणी केली. खा. भगरे, आ. बनकर यांनी धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी गाळ काढण्याचे काम अत्यावश्यक असल्याचे सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनीही मार्गदर्शन केले. या प्रसंगी वाघाड पाणी वापर संस्था अध्यक्ष चंद्रकला वडजे, उपाध्यक्ष रामनाथ पिंगळ, संजय वाबळे, रघुनाथ कदम, शिवाजी पिंगळ, डॉ. पुंडलिक धात्रक, प्रभाकर आंबेकर, नवनाथ नाठे, पुंडलिक पाटील, सागर पगारे, संदीप उगले, माधव उगले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शहाजी सोमवंशी यांनी केले.