मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेतून केंद्रीय मंत्रीमंडळात डाॅ. भारती पवार यांना काम करण्याची संधी मिळाल्यानंतर, आता अॅड. माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने प्रथमच दोघांना राज्य मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे. कोकाटे व झिरवाळ यांचा राजकीय प्रवास हा जिल्हा परिषदेपासूनच सुरू झाला आहे. आज दोघेही मंत्रीमंडळात कॅबीनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत.
जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयात हे विधानसभेची पायरी समजली जाते. जिल्हा परिषदेतून विधानसभेचा मार्ग मिळतो, असे म्हटले जाते. जिल्ह्यातील अनेकांना हा मार्ग मिळाला आहे. माजीमंत्री स्व. ए. टी. पवार, स्व. हरिश्चंचंद्र चव्हाण , अॅड. माणिकराव कोकाटे, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, अनिल कदम, धनराज महाले, नितीन पवार, नरहरी झिरवाळ, उमाजी बोरसे तर अगदी डाॅ. भारती पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला जिल्हा परिषदेतून सुरुवात झाली. यातून स्व. चव्हाण, डाॅ. पवार हे थेट संसदेत पोहोचले तर इतर जण हे विधानसभेच्या सभागृहात जाऊन पोहोचले. यातील डाॅ. पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय राज्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. या रूपाने प्रथमच जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपदाचा मान मिळाला होता. राज्यमंत्रीमंडळात आतापर्यंत जिल्ह्यातून अनेकांना संधी मिळालेली आहे. परंतु, स्व. ए. टी. पवार वगळता एकही जण जिल्हा परिषदेच्या सभागृहातून गेलेले नव्हते. झालेल्या मंत्रीमंडळात कोकाटे व झिरवाळ यांना थेट कॅबीनेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. या दोघांनाही जिल्हा परिषदेत काम केलेले आहे. कोकाटे यांनी सन १९९२ ते १९९७ व १९९७ ते १९९९ या कार्यकाळात सिन्नर तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. याच कालावधीत त्यांना अडीच वर्ष कृषी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. १९९९ च्या विधानसभेत कोकाटे यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी केली अन ते विधानसभेत निवडून गेले तर, झिरवाळ हे २००२ ते २००७ या कार्यकाळात दिंडोरी तालुक्यातून जिल्हा परिद सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर त्यांना २००४ लागलीच दिंडोरी विधानसभेतून उमेदवारी मिळाली होती. यात ते विधानसभेत निवडून गेले. परंतु, मंत्रीपदाची संधी त्यांना मिळत नव्हती. आता दोघांनाही थेट कॅबीनेट मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, १९९५ च्या मंत्रीमंडळात सिन्नरचे स्व. तुकाराम दिघोळे यांना मंत्रीमंडळात मंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर शीतल उदय सांगळे यांच्या रूपाने सिन्नला प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सिन्नरचे राजाभाऊ वाजे यांना लोकसभेत खासदार म्हणून संधी मिळाली अन् आता सिन्नरचे आमदार कोकाटे यांना कॅबीनेट मंत्रापदाच्या माध्यमातून लाल दिवा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा विद्याताई पाटील यांच्या रूपाने दिंडोरीला लाल दिवा मिळाला होता. त्यानंतर, नरहरी झिरवाळ यांना गत विधानसभा निवडणुकीत विधानसभा उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी देत सर्वोच्च मान मिळाला होता. आता झिरवाळ यांना थेट कॅबीनेट मंत्रीपदाची संधी देत दिंडोरीला लाल दिवा मिळाला आहे.