पुढारी ऑनलाइन डेस्क ; राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहे. अशातच महाविकास आघाडीसह महायुतीतही काही ठिकाणी घटक पक्षातील तिन्ही पक्षांत बंडखोरी उफाळून आली आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार(अजित पवार गट) नरहरी झिरवाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या धनराज महाले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांच्यासह महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दिंडोरीत युती धर्म पाळला जाणार किंवा नाही याबाबत शंका उपस्थित होते आहे.
महायुतीच्या वाटाघाटीत दिंडोरीची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आली आहे. याठिकाणी विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना ही उमेदवारी घोषित करण्यात आल्याने आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्याचवेळी महायुतीमधील दुसरा घटक पक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी आमदार धनराज महाले यांनीही उमेदवारी अर्द दाखल केला असून पक्षाने उमेदवारी दिली तर पक्षाकडून लढेल अन्यथा अपक्ष लढेल अशी भूमिका महाले यांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
धनराज महाले हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळ यांनी त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा घर वापसी केली. शिवसेना शिंदे गटाकडून ते दिंडोरीत निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. धनराज महाले हे माजी खासदार हरीभाऊ महाले यांचे पुत्र आहेत