मालेगाव : नार - पार, गिरणा नदीजोड प्रकल्प उत्तर महाराष्ट्राबरोबरच तालुक्यासाठी संजीवनी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील सुमारे 80 हजार एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे तालुक्याचा कायापालट होईल. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासन पूर्ततेच्या दिशेने ही वाटचाल आहे.
नार - पार प्रकल्पामुळे माळमाथा व काटवनचे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होईल. गिरणा उजवा, डावा कालव्याची क्षमता वाढून सर्वत्र हे पाणी जावे यासाठी प्रयत्न केले आहेत. बागायतीबरोबरच जिरायती क्षेत्र ओलिताखाली येईल. तालुक्यासाठी तो सुदिन ठरेल, असा विश्वास शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे व्यक्त केला.
येथील बालाजी लॉन्समध्ये नार- पार योजना सर्वेक्षण व कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, बाजार समिती सभापती चंद्रकांत शेवाळे, उपसभापती अरुणा सोनजकर, संगीता चव्हाण, नानाजी दळवी, किशोर इंगळे, डॉ. तुषार शेवाळे, नानाजी दळवी, नीलेश आहेर, लकी गिल, संजय दुसाने, मनोहर बच्छाव, पंकज निकम, सुनील देवरे, शशिकांत निकम, प्रमोद पाटील, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, नितीन पोफळे, विनोद चव्हाण, प्रतिभा सूर्यवंशी आदी होते. यावेळी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मंत्री भुसे म्हणाले की, कालव्यांच्या क्षमतावाढ व सर्वेक्षणासाठी 8 कोटी 61 लाखांची निविदा होती. हे काम अंतिम टप्प्यात आहे. कालवा क्षमतावाढीची 67 कोटींची कामे सुरू होणार आहेत. तालुक्यात या प्रकल्पांतर्गत सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची कामे होणार आहेत. संपूर्ण प्रकल्प सात हजार 465 कोटी खर्चाचा आहे. पूर्ण प्रकल्पाच्या कामासाठी किमान चार वर्षांचा अवधी अपेक्षित आहे. या काळात तालुक्यातील पायाभूत व समांतर कामे करण्याचे नियोजन आहे. निवडणुकीत जिल्हानार्मिती, नार- पार, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय ही वचने दिली होती. नार- पार करण्यापूर्वी तालुक्यातील लहान- मोठी बंधारे व जलसिंचनाची असंख्य कामे केली. या प्रकल्पाची तालुक्यातील कामे लवकरच सुरू होतील. तालुक्यातील फक्त डोंगराळ व काही भाग या प्रकल्पात वंचित राहतो. त्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. आंबेदरीसाठी चार कोटी, तर दहिकुटे धरणासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे माळमाथ्यावरही पाणी खेळणार आहे. बैठकीत सुरेश निकम, नीलेश कचवे, भारत जगताप आदींची भाषणे झाली. अभियंता गोवर्धने यांनी प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली. यावेळी स्क्रिनवर प्रकल्पाचे पीपीटी सादरीकरण करण्यात आले. जिल्हा, महाविद्यालय यथावकाश यावेळीही विधानसभा निवडणुकीत यश मिळताच मुख्यमंत्र्यांना पहिले पत्र जिल्हा मागणीचे दिले. राज्यातील अन्य काही जिल्ह्यांचीही मागणी आहे. नवीन जिल्ह्यांची घोषणा होताना मालेगावला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी जागेचा शोध सुरू आहे.
पर्यटन विकासातून रोकडोबाचा कायापालट.
चंदनपुरी व गाळणे तीर्थक्षेत्राचा विकास होणार.
100 खाटांच्या अतिरिक्त रुग्णालयाचे काम सुरू.
100 खाटांच्या आयुष रुग्णालयाची मागणी केंद्रातर्फे मंजूर.
साजवहाळला आदर्श शाळा मंजूर.
देवघट जिल्हा परिषद शाळेला आठवीची तुकडी मंजूर.
जिल्ह्यात 27 शाळांना अतिरिक्त तुकडी मंजूर. (आठवी व पाचवी)
महिला बालकल्याण रुग्णालयात तीन हजार 680 प्रसूती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देश
पातळीवर शिकविण्याची मागणी मान्य.