देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
नाशिक तालुक्यातील दारणा काठच्या नानेगावच्या सूनबाई हिमगौरी आहेर-आडके या नाशिक नगरीच्या महापौर, तर याच गावच्या सुदाम रोकडेंचे भाचेजावई विलास शिंदे हे नाशिक नगरीचे उपमहापौर झाल्यामुळे संपूर्ण दारणा काठ परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नाशिक तालुक्यातील दारणा काठच्या काही गावांना मोठा राजकीय इतिहास आहे. संसरीने तीनदा नाशिक लोकसभेला खासदार दिले. पळसे गावाने आमदारासह पंचायत समिती, जिल्हा परिषद सहकारी संस्था गाजविल्या.
त्याच धर्तीवर शिंदे, लहवित, वंजारवाडी, लोहशिंगवे, नानेगाव, राहुरी, दोनवाडे, बेलतगव्हाण, मोहगाव, बाबळेश्वर, चांदगिरी, जाखोरी, सामनगाव, लाखलगाव, ओढा, शिलापूर, चांदगिरी, एकलहरे यांचाही राजकीय इतिहास मोठा आहे.
नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आहेर-आडके यादेखील नानेगावच्या सूनबाई आहेत. नानेगावचे प्रसिद्ध कंत्राटदार बांधकाम व्यावसायिक रामकृष्ण आडके या परिवारातील रमेश आडके यांचा मुलगा अभिजित यांच्या त्या पत्नी आहेत.
मूळगाव नानेगाव असले, तरी देवळाली कॅम्प परिसरात उद्योजक व व्यावसायिक म्हणून रामकृष्ण आडके यांची ओळख होती. संपूर्ण आडके परिवार हे उच्चशिक्षित व्यावसायिक असून, आदर्श कुटुंब म्हणून नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे नानेगाव येथील सुदाम दत्तात्रय रोकडे यांच्या भगिनी लीलाबाई या वाडिव-हे येथील कातोरे परिवारात दिलेल्या असून, त्यांची मुलगी उषा कातोरे ही विलास शिंदे यांची पत्नी आहे.
त्यानुसार नानेगावकरांचे भाचेजावई विलास शिंदे हे नाशिक नगरीचे उपमहापौर झाले आहेत. गावाच्या नातेवाइकांना नाशिक नगरीचे प्रथम व द्वितीय पद प्राप्त झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लवकरच गावात महापौर, उपमहापौर यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचा मनोदय ग्रामस्थांनी बोलून दाखविला.
गेल्या काही वर्षात दारणा पट्टयाचे नाशिकच्या राजकारणातील योगदान वाढत चालले आहे. नाशिकला सर्वाधिक खासदार नाशिकरोड परिसराने दिले आहे. आताही महापालिकेत नाशिकरोड महत्वाची भूमिका बजावत आहे.