Flamingo Birds 
नाशिक

Flamingo Birds | गुलाबी थंडी आणि पक्ष्यांचा किलबिलाट; नांदूरमध्यमेश्वरमध्ये फ्लेमिंगोंचा सुंदर विहार

Flamingo Birds | फ्लेमिंगोंच्या आगमनाने अभयारण्य गजबजले : पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

विंचूर : पुढारी वृत्तसेवा

गुलाबी थंडीची चाहूल लागताच रामसर दर्जाप्राप्त नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. यंदा थंडीचे आगमन काहीसे उशिरा झाल्याने स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्कामही उशिरा सुरू झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने युरोप, सायबेरिया, मंगोलिया, कझाकिस्तान, पाकिस्तान, अमेरिका तसेच दक्षिण आशियातील विविध प्रदेशांतून आलेल्या पक्ष्यांनी अभयारण्य गजबजले असून, सुमारे ३२ हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे.

त्यात अभयारण्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या सुमारे ७० फ्लेमिंगोंचाही समावेश आहे. हे फ्लेमिंगो चापडगाव शिवारातील गोदावरी नदी परिसरात स्वच्छंदपणे विहार करताना दिसत आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झालेल्या या परदेशी पाहुण्यांमुळे गजबज वाढली आहे.

साधारण चार फूट उंची, लांब पाय आणि वैशिष्ट्यपूर्ण लांब चोच असलेला फ्लेमिंगो पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या पंखांचा खालचा लालसर रंग आकाशात उडताना अग्निज्वाळांसारखा भासतो. त्यामुळे त्याला 'अग्निपंख' असेही संबोधले जाते. या पक्ष्याला रोहित या नावानेही ओळखले जाते.

सप्टेंबर-ऑक्टोबर हा फ्लेमिंगोंचा विणीचा काळ असतो. या कालावधीत अंडी उबवून पिलांना जन्म दिल्यानंतर पिले मोठी झाल्यावर हे पक्षी खाद्य आणि अनुकूल अधिवासाच्या शोधात स्थलांतर करतात.

त्यातूनच नांदूरमध्यमेश्वर परिसरात त्यांचे आगमन होते. सध्या धरणातून मर्यादित प्रमाणात पाणी सोडल्याने अभयारण्य परिसरात पाणथळ व दलदलीचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य शोधणे सुलभ झाले आहे.

विविध प्रजाती

सध्या अभयारण्यात फ्लेमिंगोंसह गॉडविट, ब्लॅक टेल्ड गॉडविट, व्हाइट स्टॉर्क, बार-हेडेड गूज, रेड-क्रेस्टेड पोचार्ड, जांभळी कोंबडी, ब्राह्मणी बदक, थापाड्या, भुवई बदक, तलवार बदक, मोठा ठिपकेदार गरुड, दलदल ससाणा, लाल डोक्याचा शराटी, पांढरा शराटी, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, कॉमन क्रेन, राखी बगळा, चमचा, कमळ पक्षी, लाल मुनिया, हळदीकुंकू, जांभळा बगळा, तरंग आणि खंड्या आदी विविध प्रजातींचे पक्षी आढळून येत आहेत.

थंडीचे प्रमाण जसजसे वाढेल, तसतशी पक्ष्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, पुढील काही महिने या स्थलांतरित पक्ष्यांचा अभयारण्यात मुक्काम राहणार आहे. त्यामुळे देशभरातील निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पक्षी निरीक्षकांसाठी नांदूरमध्यमेश्वर हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. पर्यटकांसाठी प्रशासनाने वाहनतळ, पक्षीनिरीक्षणासाठी अत्याधुनिक दुर्बिणी, पक्ष्यांची माहिती देणारे मार्गदर्शक, भोजन व निवासव्यवस्था तसेच अभयारण्याकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक उपलब्ध करून दिले आहेत.

"यंदा फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या चांगली असून, आगामी काळात आणखी पक्षी दाखल होण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांना पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेता यावा, यासाठी अभयारण्यातून अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे."
— हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT