Nandur Madhmeshwar Sanctuary  
नाशिक

Nandur Madhameshwar Eco Tourism | नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यासाठी 'इको-टुरिझम विकास आराखडा'; जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

Nandur Madhameshwar Eco Tourism | नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यालगतच्या स्थानिकांना रोजगाराच्या संधी ; शाश्वत पर्यटनाला मिळणार चालना

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या शाश्वत विकास व संवर्धनासाठी जिल्हा प्रशासन नाशिक आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वन्यजीव विभागाच्या संयुक्त विद्यमाने 'इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा' तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

अभयारण्याचा पर्यावरणीय समतोल कायम राखत जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा विकसित करणे, वैज्ञानिक संशोधनाला चालना देणे तसेच स्थानिक समुदायाचा पर्यटन विकासात सक्रिय सहभाग वाढविणे, हा या आराखड्याचा प्रमुख उद्देश असून, आराखड्यात अभयारण्यातील जलपर्णी व इतर आक्रमक वनस्पतींचे निर्मूलन, पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी व बेटे तयार करणे तसेच जलगुणवत्ता नियंत्रण यंत्रणा उभारण्याचा समावेश आहे. या उपाययोजनांमुळे जलपरिसंस्थेचे संवर्धन आणि पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास निर्मितीस मदत होणार आहे.


त्याचप्रमाणे पर्यटकांना अभयारण्याची जैवविविधता अधिक प्रभावीपणे अनुभवता यावी, यासाठी निसर्ग परिचय केंद्र, आधुनिक निवास व्यवस्था, कॉन्फरन्स रूम, वॉच गॅलरी, फ्लोटिंग ट्रेल आणि पक्षी निरीक्षण केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अभयारण्यात ई-वाहने व चार्जिंग स्टेशन सुविधा उपलब्ध करून देण्याचेही प्रस्तावित आहे.

पॅडल व कायाक बोटिंगसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाणार असून, अभयारण्यालगतच्या १२ गावांतील स्थानिक युवकांना प्रमाणित निसर्ग व पक्षी मार्गदर्शक, होम-स्टे आणि इको-कॅफे संचालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच पर्यटनातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नातील ३० टक्के निधी स्थानिक विकासासाठी वापरण्याचे नियोजन असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस खा. भास्कर भगरे, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश शेपट, कृष्णा भवर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, संदीप जाधव, हिरालाल चौधरी, डॉ. जयंत वडतकर, डॉ. विजय बर्वे, मनीष गोडबोले, डॉ. अ‍ॅंग्रेस खरात, अभिनव नायर, पक्षी अभ्यासक सतीश गोगटे, डॉ. अनिल माळी, मनोज जोशी, अनंत सरोज, प्रा. अदिती शेरे आदी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा

अभयारण्यातील वन्यजीव आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी ड्रोन, स्मार्ट अ‍ॅप आणि थर्मल कॅमेऱ्यांचा वापर करून प्रभावी गस्त व देखरेख यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे वन्यजीव संरक्षण, अवैध हालचालींवर नियंत्रण आणि अभयारण्याच्या संवेदनशील भागांवर देखरेख ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.

त्याचप्रमाणे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने पक्षी रिंगिंग स्टेशन तसेच मध्य आशियाई उड्डाण मार्गावरील पक्ष्यांच्या आ-यासासाठी केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय ५० हून अधिक शाळांमध्ये इको-क्लब स्थापन करून विद्यार्थी व नागरिकांमध्ये जैवविविधता, पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT