नांदगाव : नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणाजवळ रविवारी (दि. १४) दुपारी सुमारास तीन वाजता मिनी ट्रॅव्हल्सची बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून तब्बल ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना तात्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
प्रवासी छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी नांदगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.