नाशिक

Namo Maharojgar Melawa : नगरला २८, २९ फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा, अशी करा नोंदणी

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येत्या २८ व २९ तारखेला नगर येथे नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा होणार आहे. त्या अनुषंगाने विभागामधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेराेजगार युवक-युवतींची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केल्या. (Namo Maharojgar Melawa)

नगर येथील भिस्तबाग महल मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने मंत्री विखे-पाटील यांनी शुक्रवारी (दि.१६) विभागातील अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी खासदार सुजय विखे-पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कौशल्य विकास विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह विभागातील चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, 'एमआयडीसी'चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. (Namo Maharojgar Melawa)

मंत्री विखे-पाटील पुढे म्हणाले, रोजगार मेळाव्यासाठी अधिकाधिक कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती द्यावी. शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या मेळाव्याची माहिती पोहोचवावी. तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन, विविध औद्योगिक संस्था, विभागातील सर्व विद्यापीठे यांचादेखील समावेश करावा. मेळाव्याच्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र उभारावे. मेळाव्याची प्रचार-प्रसिद्धी, नोंदणीसाठी डिजिटल माध्यमद्वारे नोंदणीसाठी लिंक तयार करावी आदी सूचना त्यांनी केल्या.

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रोजगार मेळाव्यात एकूण २०० पेक्षा अधिक आस्थापना सहभागी होणार असून, ३० हजार उमेदवारांची उपस्थिती अपेक्षित आहे. प्राथमिक निवडमध्ये १५ हजार उमेदवारांची निवड होऊन १० हजार उमेदवारांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

नावनोंदणीसाठी स्वतंत्र लिंक

विभागात पाचही जिल्ह्यांतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित, जाहीर करणे तसेच उमेदवारांची व रिक्तपदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवारांना नोंदणीसाठी स्वतंत्र लिंक तयार करून ती जिल्हा परिषद, महानगरपालिका, समाजकल्याण विभाग व इतर विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश विखे-पाटील यांनी दिले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT