नाशिक

Orphan Siblings | "आईचे छत्र हरपले, वडील मजुरीला; पण नगरसूलच्या 8 ज्येष्ठांनी अनाथ बहीण-भावंडांच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी"

Orphan Siblings | कोळगावच्या कावेरी व विशालच्या शिक्षणाची उचलली जबाबदारी

पुढारी वृत्तसेवा

नगरसूल : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील कोळगाव येथील अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या अनाथ बहीण - भावंडांच्या शिक्षणासाठी नगरसूल येथील काही ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत मानवतेचा आदर्श घालून दिला. नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी कावेरी धनवटे आणि येवला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) नुकताच प्रवेश घेतलेला तिचा भाऊ विशाल धनवटे यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी समजल्यानंतर नगरसूलमधील सात ते आठ ज्येष्ठ नागरिक भावुक झाले.

मात्र केवळ सहानुभूती व्यक्त न करता, त्यांनी या दोघांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम आधार दिला. न्यू इंग्लिश स्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. एस. पैठणकर, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी बबन पैठणकर, माजी सरपंच राजेंद्र पगारे, ज्येष्ठ शेतकरी काशीनाथ दादा रावते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिश्चंद्र जाधव, सेवानिवृत्त शिक्षक जनार्दन पुंड, सामाजिक कार्यकर्ते गणेश गादीकर आणि नगरसूल सोसायटीचे संचालक शिवाजी कमोदकर यांनी कावेरीच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.

तसेच त्यांनी कोळगाव येथे जाऊन कावेरी व विशाल यांच्या राहत्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतानाही या भावंडांना अद्याप घरकुल, रेशनकार्ड किंवा शासकीय धान्य यांसारख्या मूलभूत सुविधांचाही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अधिकच कठीण झाले आहे.

अशा परिस्थितीत नगरसूलच्या ज्येष्ठांनी दिलेला शैक्षणिक आधार, शैक्षणिक साहित्य आणि भविष्यातील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याने कावेरी आणि विशाल यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. समाजातील संवेदनशील व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया समाजात व्यक्त केल्या जात आहेत.

मिळेल ते काम करीत शिक्षण

कावेरी आणि विशाल यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. लहान वयातच त्यांच्या आईचे निधन झाले. वडील अशोक धनवटे हे उदरनिर्वाहासाठी मजुरी कामानिमित्त बाहेरगावी राहतात. मामाचाही मृत्यू झाल्यामुळे या दोघांवर लहानपणापासूनच संघर्षाचे सावट आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्र्याच्या झोपडीत राहून मिळेल ते काम करीत शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT