Akhatwade Poisoning Case  
नाशिक

Akhatwade Poisoning Case | आखतवाडेतील संशयित विषबाधा प्रकरण गडद

Akhatwade Poisoning Case | वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूनंतर मुलगा बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

जायखेडा : पुढारी वृत्तसेवा

बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथील संशयित विषबाधा प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, उपचारादरम्यान वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू, शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण स्पष्ट न होणे आणि त्यातच त्यांना रुग्णालयात दाखल करणारा मुलगा दीपक ह्याळीज बेपत्ता झाल्याने या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. दोघांचेही व्हिसेरा नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

आखतवाडे येथील द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (६८) आणि शांताराम ह्याळीज (७८) यांनी २९ जून रोजी घरी जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम रामपूर ग्रामीण रुग्णालय, नामपूर येथे दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय, मालेगाव येथे हलविण्यात आले.

उपचारादरम्यान द्वारकाबाई ह्याळीज यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शांताराम ह्याळीज यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू ठेवण्यात आले. काही काळ प्रकृतीत सुधारणा दिसून आली; मात्र नंतर प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांचाही मृत्यू झाला. काही दिवसांच्या अंतराने वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

सुरवातीला चिकनचे जेवण किंवा त्यानंतर घेतलेल्या दही-दुधामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे निश्चित कारण नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोघांचेही व्हिसेरा नमुने न्यायवैद्यक आणि रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

पोलिसांकडून अन्नातून विषबाधा, विषारी पदार्थाचे सेवन, अपघाती घटना अथवा इतर कोणत्याही शक्यतेच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदविण्याबरोबरच वैद्यकीय अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

तर्क-वितर्कांना उधाण

या प्रकरणातील महत्त्वाचा धागा मानला जाणारा मुलगा दीपक ह्याळीज हा आई-वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अचानक बेपत्ता झाला आहे. त्याचा मोबाईलही बंद असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असले, तरी पोलिसांनी कोणतीही शक्यता अद्याप नाकारलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT