Death Pudhari
नाशिक

Nashik Security Guard Death | नाशिकरोड हादरले! बांधकाम साईटवर सुरक्षारक्षकाचा संशयास्पद मृत्यू; पाण्याचा खड्ड्यात आढळला मृतदेह

Nashik Security Guard Death | नाशिकरोड येथील बांधकाम साईटवरील घटना

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील गुरुद्वारासमोर हरी नक्षत्र परिसरातील सुरू असलेल्या बांधकाम साईटवर सुरक्षारक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी सकाळी खळबळ उडाली. सुरेश चौधरी (५५, रा. जेलरोड) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव असून, त्यांच्या मृत्यूबाबत घात की अपघात याबाबत सध्या तर्कवितर्क सुरू आहेत.

चौधरी हे शनिवारी नेहमीप्रमाणे ड्यूटीवर होते. त्यांची ड्यूटी रात्री ८ पर्यंत असते. मात्र, ड्यूटी संपण्यापूर्वीच ते दिसेनासे झाल्याने इतर सुरक्षारक्षक व कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत.

रविवारी सकाळी सुरक्षारक्षक कैलास रसाट ड्यूटीवर आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे साईटची पाहणी केली असता पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ वरिष्ठ व पोलिसांना माहिती दिली. उपनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दुपारी १२ वाजता मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. ही घटना बिटको कॉलेजसमोरील नरेश कारडा यांच्या कारडा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या इमारत बांधकाम साईटवर घडली. येथे बांधकामासाठी खोलवर खड्डा खणलेला असून, त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार त्या खड्यात पडूनच चौधरी यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी एका महिला मजुराचाही संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या घटनेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. अपूर्ण व धोकादायक अवस्थेत असलेल्या बांधकाम साईटमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT