नाशिक: एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे म्युच्यूअल फंडांचा हुरूप वाढला असून विविध संकल्पनावर आधारित नवीन फंड योजनांचा आविष्कार साकारला आहे. प्रामुख्याने टियर टू आणि थ्री शहरातील गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेवत नवनवीन संकल्पांवरील फंड बाजारात येत आहेत. सध्या २१०० म्युच्यूअल फंड सुरु आहेत. आता या योजनांत मल्टी फॅक्टर आणि ग्रामीण अर्थव्यवस्था या संकल्पनांवर आधारलेल्या फंड योजनांची भर पडत आहे.
शेअरबाजारात सध्या मुदतमुक्त, ग्रोथ, इक्विटी, हायब्रिड, रिटायरमेंट, चिल्ड्रेन्स, इंडेक्स, गोल्ड इटीएफ, इटीएफ, इन्कम, डेट, फंड ऑफ फंड अशा प्रमुख वर्गवारीतील अनेक योजना आहेत. सध्या एसआयपीच्या माध्यमातून फंडात दरमहा सरासरी तीस हजार कोटी रुपयांचा निधी गुंतवला जात आहे. विविध योजनांतर्गत म्युच्यूअल फंड उद्योग सप्टेंबरअखेरीस तब्बल ७८ लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन सांभाळत आहे. सोन्याने उसळी मारल्यानंतर गत दोन महिन्यात गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमध्ये आपली गुंतवणूक वाढवली. त्यातील गुंतवणूक सुमारे ८० हजार कोटी रुपयांवर पोहचली आहे.
मल्टी-फॅक्टर फंडाचा उदय
फ्रॅँकलिन टेम्लपटन (इंडिया) ने विविध घटकांचा आधार घेणारा फ्रँकलिन इंडिया मल्टी-फॅक्टर फंड (एफआयएमएफ) हा नवीन फंड आणला आहे. ही प्रामुख्याने मुदतमूक्त स्वरुपातील इक्विटी फंड योजना आहे. ही योजना विविध घटकांआधारे संख्यात्मक गुंतवणूक धोरणाचा वापर करणार आहे. गुणवत्ता, मूल्य, भावना आणि पर्याय यासारख्या घटकांच्या आधारे समभाग निवडीकरिता मल्टी-फॅक्टर फंड डेटावर आधारलेला दृष्टिकोन वापरणार आहे.
सध्याच्या गुंतवणूक विश्वात बाजार भांडवलीकरणानुसार भारतात ५०० कंपन्या उपलब्ध आहेत. या आघाडीच्या कंपन्या शेअरबाजारात सुचीबध्द आहेत. शिस्तबद्ध गुंतवणूक पध्दत तसेच गुंतवणूकीसाठी विशिष्ट प्रारुप (मॉडेल) यांचा मिलाफ घडवत गुंतवणूकदारांना जोखीम-आधारित परतावा प्रदान करणे, हे फ्रँकलिनच्या फंडाचे उद्दिष्ट आहे. हा फंड १० ते २४ नोव्हेंबरदरम्यान गुंतवणूकीसाठी खूला राहणार आहे.
सर्वांच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञान हा घटक सखोल रुजला आहे. आपली कामाची, संवादाची आणि दैनंदिन निर्णयाची पध्दत तंत्रज्ञानाने पार बदलून टाकली आहे. तंत्रज्ञानातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदयामुळे आता अतिशय व्यापक स्तरावर माहितीचे विश्लेषणासाठी परिमाणात्मक असे डेटा मॉडेल साकारणे शक्य झाले आहे. हे मॉडेल पोर्टफोलिओ व्यवस्थापकांना गुंतवणूकीच्या संधी शोधण्यास मदत करू शकते. ”अविनाश सातवळेकर, फ्रँकलिन टेम्पलटन-इंडिया
रुरल अपॉर्च्युनिटीज फंड
कोटक महिंद्राने गुंतवणूकदारांसाठी कोटक रुरल अपॉर्च्युनिटीज ही नवीन फंड योजना आणली आहे. मुदतमुक्त स्वरुपातील ही इक्विटी योजना प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच संबंधित संकल्पनावर आधारलेली आहे. हा फंड गुंतवणूकदारांसाठी ६ ते २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सार्वजनिक गुंतवणूकीसाठी खुला आहे.
भारतातील ग्रामीण परिवर्तनाशी संबंधित असलेल्या तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या परिवर्तनाचा फायदा मिळणाऱ्या कंपन्यांचे समभाग आणि समभागाशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये हा फंड प्रामुख्याने गुंतवणूक करणार आहे. अशा गुंतवणूकीतून दीर्घकालीन भांडवल वृध्दीची निर्मिती, हे फंडाचे उद्दिष्ट आहे. या फंड योजनेसाठी निफ्टी रुरल इंडेक्स हा संदर्भ निर्देशांक राहणार आहे
ग्रामीण भारत आता फक्त शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो भारताच्या विकासातील एक नवे दालन आहे. आर्थिक समावेशापासून ते डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि अगदी स्थानिक उत्पादनापर्यंत अशा नानाविध बाबींमुळे ग्रामीण भारत संधी, आकांक्षा आणि धोरणांनी प्रेरित अशा परिवर्तनाचा एक नवीन पैलू ठरला आहे. ग्रामीण भागातील वाढते उत्पन्न आणि ग्राहकपयोगी वस्तूंचा वाढता वापर आता भारताच्या ढोबळ अर्थप्रणालीचे अविभाज्य अंग बनले आहे.निलेश शाह, व्यवस्थापकीय संचालक, कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट
ग्रामीण भारत हा आता शेतीच्या पलीकडे झपाट्याने विकसित होत चालला आहे. ग्रामीण भागातील सुमारे ४० टक्के कामगार आता बिगर-कृषी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. कामगार संख्येमध्ये २०१८ पासून महिलांचा सहभाग जवळजवळ दुप्पट झाला आहे. त्यामुळे दुहेरी उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ग्रामीण भागात निम्म्याहून अधिक खर्च आता बिगर-अन्न वस्तूंवर होत आहे. उत्पन्न, आकांक्षा आणि वस्तूंचा उपभोग या गतिमान केंद्रांकडे ग्रामीण भाग झपाट्याने वाटचाल करत असल्याचे यातून दिसून येते.