Murder
नाशिक हादरलं ! घरात शिरून हद्दपार गुन्हेगाराची हत्या pudhari photo
नाशिक

Murder | नाशिक हादरलं ! घरात शिरून सराईत गुन्हेगाराची हत्या

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : चार ते पाच जणांच्या टोळक्याने घरात शिरून हद्दपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगाराचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना गंजमाळ येथील पंचशिलनगर येथे घडली. पांडुरंग उर्फ पांड्या हनुमंत शिंगाडे (२०, रा. गंजमाळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

मोबाइल चोरण्यात शिंगाडे कुख्यात

घरात चार्जिंगला लावलेले मोबाइल चोरण्यात शिंगाडे कुख्यात होता. त्याला शहर पोलिसांनी अनेकदा पकडले होते. तसेच त्याच्याविरोधात चोरी व मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याने त्याला शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले होते. तरीदेखील तो शहरात गुन्हे करत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, गुरुवारी (दि. ४) मध्यरात्री शिंगाडे त्याच्या घरात झोपलेला होता. त्यावेळी पंचशिलनगर येथीलच काही युवक त्याच्या घरात शिरले. त्यांनी धारदार शस्त्रांनी केलेल्या वारांमुळे झोपेत असलेल्या शिंगाडेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संशयितांनी तेथून पळ काढला.

तिघांविरोधात खुनाचा गुन्हा

घटनेची माहिती मिळताच पाेलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करून पांडुरंगच्या नातलग व रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर गाेंधळ घातला. संशयितांना लवकरच पकडले जाईल, असे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर तणाव काहीसा निवळला. विकास शिंगाडे यांच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांमध्ये यापूर्वी वाद

पांडुरंग आणि संशयित कैलास गायकवाड, निखिल सच्चे व इतर संशयितांमध्ये यापूर्वी वाद झाल्याचे समोर आले आहे. मद्य पिण्याच्या वादासह पैशांच्या कारणातून वाद झाल्याने तसेच त्यांच्यात नेहमी क्षुल्लक कारणांतून वाद हाेत हाेते. त्यामुळे संशयितांनी संगनमत करून पांडुरंगचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मारेकऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SCROLL FOR NEXT