Dengue
डेंग्यू प्राणघातक आहे Pudhari News Network
नाशिक

Nashik Alert | डेंग्यू निर्मूलनासाठी महापालिका फ्रंटफूटवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरातील डेंग्यूच्या साथीचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, डासांची उत्पत्तीस्थळे आढळणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी (दि. १६) महापालिका पथकाच्या तपासणीत डासांची उत्पत्तीस्थळे आढळलेल्या गंगापूर रोडवरील नवीन बांधकाम प्रकल्पासह वडाळा गाव परिसरातील बड्या रुग्णालयासह दोन दिवसांत ४९२ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

गेल्या अडीच महिन्यांपासून शहराला डेंग्यूचा ज्वर चढला आहे. मे महिन्यामध्ये ३३, जूनमध्ये १६१ डेंग्यू रुग्ण आढळल्यानंतर जुलैतील गेल्या दोन आठवड्यांतच डेंग्यूचे नवे २०० रुग्ण आढळल्यामुळे शहरात या आजाराच्या साथीचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

नाशिक 'डेंजर झोन'मध्ये

नाशिक 'डेंजर झोन'मध्ये गेल्यामुळे केंद्र शासनाच्या मलेरिया विभागाच्या तीन सदस्यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक शहरात दौरा करत काही ठिकाणांची पाहणी केली होती. यात खुद्द पथकाच्या नजरेला उंटवाडी आणि संभाजी चौकात डास उत्पत्तीस्थळे आढळल्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत या पथकाने मनपा वैद्यकीय विभाग व मलेरिया विभागाला ॲक्शन प्लॅन तयार करून तातडीने डेंग्यूला आळा घालण्यासाठी कारवाईचे आदेश दिले होते.

आशा वर्करची मदत घेत घरोघरी तपासणी

मलेरिया विभागाने आपल्या मलेरिया वर्कर्सबरोबरच आशा वर्करची मदत घेत घरभेटी तसेच विविध आस्थापनांची पाहणी करून तेथील पाणीसाठे तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. एकूण १७९ पथके स्थापन करण्यात आले असून, दररोज सुमारे सहा हजार घरे तसेच आस्थापना तपासण्याचे निर्देश मनपा मलेरिया विभागाचे अधिकारी डॉ. नितीन रावते यांनी पथकांना दिले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी सोमवारी (दि. १५) पाच हजार ८०० घरांना भेटी देण्यात आल्या. तसेच मंगळवारी (दि. १६) पथकाच्या पाहणीत गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील बांधकाम प्रकल्पाच्या परिसरात डास उत्पत्तीस्थळे आढळल्याप्रकरणी 10 हजार रुपयांचा दंड केला असून, वडाळा गाव परिसरातील बड्या रुग्णालयाच्या पार्किंगमध्येही उत्पत्तीस्थळे आढळल्याने पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती डॉ. रावते यांनी दिली.

डेंग्यू निर्मूलनासाठी डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकांमार्फत घरोघरी तसेच व्यावसायिक व इतरही आस्थापनांच्या ठिकाणांची तपासणी केली जात आहे. दंडात्मक तसेच इतर कारवाई होण्यापूर्वीच संबंधित आस्थापना तसेच मालमत्ताधारकांनी काळजी घेऊन डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
डॉ. नितीन रावते, मुख्य अधिकारी, मलेरिया विभाग, नाशिक.
SCROLL FOR NEXT