WhatsApp
व्हॉट‌स‌ॲप file photo
नाशिक

नाशिक : काय! खड्डे, पाणी तुंबतयं.. तुमच्या तक्रारी व्हॉट‌स‌ॲप करा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पावसाळ्यात पाणी तुंबल्यास अथवा रस्त्यावर खड्डे पडल्यास नागरिकांना आता महापालिकेकडे व्हॉट‌स‌ॲपद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे. यासाठी महापालिकेने ७९७२१५४७९३ हा भ्रमणध्वनी क्रमांक जारी केला आहे.

पावसाळा आला की ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या घरात शिरते. यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान होते. रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास तर पावसाळ्यात नित्याचा बनला आहे. पावसाळा सुरू होत नाही तोच शहरातील रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहेत. माजी महापौर दशरथ पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच शहराती रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधत महापालिकेवर टीका केली होती. खड्ड्यांमुळे नागरिकांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने खड्डे निर्मूलनाची मोहिमच हाती घेतली आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून महापालिकेने व्हॉट‌स‌ॲपवर तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. या व्हॉट‌स‌ॲप क्रमांकावर तक्रार पाठविण्याचे आवाहन बांधकाम विभागातर्फे करण्यात आले आहे.

...तर नंबर ब्लॉक होणार!

नागरिकांना व्हॉट‌स‌ॲपवर तक्रारीची सुविधा उपलब्ध करून देताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने नागरिकांना चक्क दमही भरला आहे. रस्त्यांवर पावसामुळे पाणी साचलेले अथवा खड्डे पडलेले दिसून आल्यास सदर व्हॉट‌स‌ॲप क्रमांकावर छायाचित्रासह माहिती द्यावी, असे आवाहन करताना सदर व्हाट्सअप क्रमांकावर कॉल करू नये, अन्यथा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला जाईल, असा इशाराच बांधकाम विभागाने दिला आहे.

SCROLL FOR NEXT