Divyang 
नाशिक

Nashik Divyang Welfare Fund Hiked to 72.65 Crore| दिव्यांग 34.66 कोटींचा जादा निधी कल्याणासाठी, महापालिका महासभेत प्रस्ताव मंजूर

महापालिका महासभेत प्रस्ताव मंजूर; दिव्यांगांसाठीच्या योजनांचा निधी ७२.६५ कोटींवर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय व महापालिकेच्या योजनांचा लाभ मिळण्यासह त्यांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि दैनंदिन सुविधांसाठी नाशिक महापालिकेने आर्थिक तरतूद वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी तब्बल ३४ कोटी ६६ लाख ६० हजार रुपयांची वाढीव तरतूद करण्याच्या प्रस्तावाला महासभेने जादा विषयात मंजुरी दिली. त्यामुळे या योजनांसाठीची एकूण उपलब्ध तरतूद ७२ कोटी ६५ लाख ६० हजार रुपयांवर पोहोचली आहे.

महापालिका आयुक्तांनी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून हा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. सन २०२६-२७ च्या मूळ अंदाजपत्रकात दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी ३७ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र, विविध योजनांवरील अपेक्षित खर्च, लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावयाच्या सुविधा आणि देखभाल - दुरुस्ती कामांचा विचार करता, अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार मूळ तरतुदी-व्यतिरिक्त ३४ कोटी ६६ लाख ६० हजार रुपयांची वाढीव तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडला.

या निधीतून दिव्यांगांसाठी विशेष कल्याणकारी योजना राबविणे, शिक्षण व प्रशिक्षण केंद्रांचे व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, पायाभूत विकासकामे, लिफ्टची उभारणी व देखभाल, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन तसेच शहर बससेवेत प्रवास भाड्यात सवलत देणे आदी बाबींवर खर्च होणार आहे. दिव्यांगांना महापालिकेच्या विविध सेवा-सुविधांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, हा या तरतुदीमागील उद्देश आहे.

प्रस्तावात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार अर्थसंकल्पीय शीर्षांमध्ये आवश्यक बदल करून, वाढीव निधी उपलब्ध करून देता येणार आहे. तसेच विभागाच्या प्रत्यक्ष खर्चाचा आणि उपलब्ध निधीचा विचार करून, तरतुदींचे वर्गीकरण करण्याची मुभा प्रशासनाला राहणार आहे. समाजकल्याण विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावाला महासभेने जादा विषयात मंजुरी दिल्याने दिव्यांग कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी वाढीव आर्थिक तरतुदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

योजनानिहाय वाढीव तरतूद

दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना -२०.३२ कोटी

दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण सुविधा केंद्र -१ कोटी

दिव्यांगांच्या सुविधांसाठी विद्युत व्यवस्थापन - १.१० कोटी

दिव्यांगांसाठीच्या फिरत्या दवाखान्याची देखभाल दुरुस्ती - ५ लाख

मनपा आरोग्य केंद्रांमध्ये दिव्यांगांसाठी आरोग्यसुविधा - ८० लाख

दिव्यांगांसाठी पॅरा आऑलिम्पिक स्पर्धा ७५ लाख

दिव्यांगांच्या सेवासुविधांचे स्थापत्य व्यवस्थापन - ७.२६ कोटी

दिव्यांगांसाठी सिटीलिंक बस भाड्यात सवलत - ४० लाख

दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण सेवासुविधा केंद्र संचलन - २.९७ कोटी

निधीचे आर्थिक नियोजन

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीची मूळ तरतूद - ३७.९९ कोटी

वाढीव तरतूद - ३४.६६ कोटी

एकूण उपलब्ध तरतूद - ७२.६५ कोटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT