नाशिक : सफाई कर्मचारी आउटसोर्सिंग ठेक्याची निविदा दुसर्यांदा रद्द करताना महापालिका प्रशासनाने या ठेक्याच्या प्राकलनात आमूलाग्र बदल केले असून, या ठेक्यावरील 237 कोटींचा खर्च तब्बल 134 कोटींनी कमी करत 103.98 कोटींच्या खर्चास महासभेची नव्याने प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली आहे. यात कंत्राटी सफाई कर्मचार्यांची संख्या 1,175 वरून घटवून पुन्हा मूळ प्रस्तावानुसार 875 वर आणण्यात आली असून, ठेक्याचा कालावधीदेखील पाच वर्षांवरून कमी करून तीन वर्षांवर आणण्यात आला आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात 2,160 किमी लांबीचे रस्ते असून, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचार्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने आउटसोर्सिंगचा निर्णय घेतला. 1 ऑगस्ट 2020 पासून ‘वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स, नाशिक’ या कंपनीला 700 सफाई कर्मचारी पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता. हा ठेका 31 जुलै 2023 रोजी संपल्यानंतर, नवीन मक्तेदार निवड होईपर्यंत जुन्या मक्तेदारास मुदतवाढ दिली जात आहे.
नाशिक पूर्व-पश्चिम विभाग, गोदाघाट व महापालिकेच्या विभागीय कार्यालये, सर्व नाट्यगृहांसह विविध शासकीय स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी 875 कंत्राटी कर्मचार्यांच्या पाच वर्षांच्या सेवेसाठी 176 कोटींची निविदा काढण्यात आली आहे. परंतु, यात केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्याची तक्रार करत वॉटरग्रेस कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर महापालिकेने ही निविदा रद्द करत दुसर्यांदा 1,175 कर्मचारी पुरवठ्याची पाच वर्षे मुदतीची 237 कोटींची निविदा प्रक्रिया राबविली. मात्र या प्रक्रियेतही विशिष्ट ठेकेदाराला पात्र करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्याची तक्रार करत वॉटरग्रेसने न्यायालयात पुन्हा धाव घेतली.
दरम्यान, या निविदा प्रक्रियेत प्राप्त चारपैकी तीन ठेकेदार अपात्र ठरल्याचे कारण देत प्रशासनाने दुसर्यांदा राबविलेली निविदा प्रक्रियाही रद्द करत तिसर्यांदा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्मचारी संख्या अन् ठेक्याचा कालावधी घटविला
दुसर्यांदा राबवलेल्या निविदा प्रक्रियेत सिंहस्थ कुंभमेळ्याचा संदर्भ देत 1,175 कंत्राटी सफाई कर्मचार्यांसाठी पाच वर्षांचा ठेका दिला जाणार होता. यासाठी यापूर्वीच्या प्रस्तावात 58 कोटींची वाढ करत ठेक्याची रक्कम 237 कोटींपर्यंत वाढविली गेली. आता तिसर्यांदा नव्याने निविदा काढताना कर्मचारी संख्या 875 वर आणण्यात आली असून, ठेक्याचा कालावधीही तीन वर्षांपर्यंत मर्यादित केला आहे.