इगतपुरी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील ऑरेंज हॉटेलजवळ मंगळवार (दि. ३) रात्री १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात उत्तर प्रदेशमधील तिघांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांचा जागीच, तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
रियाज हासियत अली, आसादुला अली व अफजल बैतुलहा असे मृतांची नावे आहेत. मुंबईकडून नाशिकडे भरधाव वेगाने जात असताना तीव्र वळणावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाने जागीच तीन वेळा उलटल्याने कारचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलिस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे कसारा व खर्डी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित व सहायक पोलिस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.