ओझर येथील मुंबई–आग्रा महामार्गावर मालेगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कडधान्याच्या ट्रकला लागलेली आग Pudhari
नाशिक

Ozar Truck Fire | मुंबई–आग्रा महामार्गावर ओझरजवळ धावत्या ट्रकला भीषण आग

Nashik News | मालेगावहून नाशिकच्या दिशेने जात असताना ट्रकच्या पाठीमागील टायरमधून धूर

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Agra Highway fire

ओझर : मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील एचएएल उड्डाणपुलाजवळ (ओझर) कडधान्याने भरलेल्या धावत्या ट्रकला आज (दि. ४) पहाटे सुमारे ४.४५ वाजता अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रकचे केबिन व पाठीमागील टायर पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार MH 18 BG 6493 क्रमांकाचा कडधान्याने भरलेला ट्रक मालेगावहून नाशिकच्या दिशेने जात असताना ट्रकच्या पाठीमागील टायरमधून अतिउष्णतेमुळे धूर येऊ लागला. हे लक्षात येताच चालक मोहम्मद अश्रफ अन्सारी (रा. धुळे) यांनी प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र काही क्षणातच ट्रकने अचानक पेट घेतला. आगीत ट्रकचे इंजिन केबिन व टायर पूर्णपणे जळून खाक झाले.

घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव महामार्ग पोलीस केंद्र व ओझर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माळोदे यांच्यासह पोलीस अंमलदार सानप, काकवीपुरे व टोंगारे यांनी परिस्थिती नियंत्रणात घेत वाहतूक तातडीने सर्व्हिस रोडने वळवली.

दरम्यान, एचएएल तसेच ओझर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली व संपूर्ण आग विझवली. ट्रक रस्त्याच्या कडेला असल्याने काही वेळानंतर महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT