नाशिक: विधानसभेच्या निवडणुकीच्या कामकाजामुळे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान रेंगाळले असून जिल्ह्यातील जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, विभागस्तरीय अशा सुमारे २७५९ गुणांकन प्राप्त शाळा गत तीन महिन्यांपासून पारितोषिकाच्या प्रतिक्षेत आहेत.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा अभियानाचा दुसरा टप्पा 2024-25 पासून सुरु करण्यात आला. यामध्ये शाळेला शैक्षणिक गुणवत्तेच्या पायाभुत सुविधांच्या अन व्यवस्थापनातील कार्यक्षमतेच्या आधारे गुणांकन दिले जातात. जिल्हा परिषदेने आपल्या अखत्यारीत येणार्या जिल्हा परिषदेच्या, शासकीय व इतर व्यवस्थानाच्या खाजगी शाळांना अभियानात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार एकूण २७५९ शाळा अभियानात सहभागी झाल्या. या शाळांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे गुणांकन देण्यात आले आहे. याचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला. मात्र विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे अभियान रेंगाळले. पाच डिसेंबरला सरकार स्थापन होऊन स्थिरसावर झाले की, अभियानाची प्रक्रिया पुन्हा एकदा वेग घेण्याची चिन्हे आहेत. यामुळे पुढील महिन्याभरात गुणांकन प्राप्त शाळांना पुरस्काराची प्राप्ती होण्याची शक्यता आहे.
प्रथम क्रमांक : 51 लाख
व्दितीय क्रमांक : 21 लाख
तिसरा क्रमांक : 11 लाख
-------------
१) पायाभुत सुविधा : शाळांमध्ये स्वच्छता, प्रयोगशाळा, सॅनिटरी सुविधांची उपलब्धता यावर आधारीत गुणांकन
२) शासन धोरणांची अंमजबजावणी : उपक्रम राबविण्याची गुणवत्ता आणि योजनेच्या अंमलबजावणीनुसार मुल्यांकन
३) स्वच्छता मॉनिटर, डिजीटल लॅब, शाळा परसबाग सारखे उपक्रमांच्या अंमलबजावणीस गुणांकन.
४) विद्यार्थ्यांना पोषक आहार, एकसमान गणवेश, व्यावसायिक शिक्षणाचे धडे यावर आधारीत गुणांकन
जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळा अभियानात सहभागी झाल्या असून मुल्यांकनांच्या निकषानुसार त्यांना गुणांकन देण्यात आले आहे. अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी शाळांना गुणांकनानुसार पारितोषिक प्राप्त होणार असून शासनाकडून निर्देश आल्यावर अभियानाचा निकाल त्वरीत जाहीर करण्यात येईल.- नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग