नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एमएसआरटीसी या अॅपच्या माध्यमातून लालपरीच्या लोकेशनची सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत, प्रवाशांना महामंडळाच्या व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमद्वारे लालपरी मार्गावर कुठपर्यंत पोहोचली आहे आणि कोणत्या स्थानकावर किती वेळ थांबेल याची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रवासाला निघणाऱ्या आणि बसस्थानकावर आप्तांना घेण्यासाठी जाणाऱ्यांची मोठी साेय होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळ आता मध्य रेल्वे आणि मेट्रोप्रमाणे प्रगती करत असून, प्रवाशांना आधुनिक ऑनलाइन सुविधा देण्यावर विशेष भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून एमएसआरटीसी अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे लालपरीच्या मार्गात किती आणि कुठली स्थानके आहेत, कुठल्या स्थानकावर किती वेळ थांबणार आहे हे सर्व बघता येणार आहे. एसटीचे लोकेशन तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची माहितीदेखील मिळू शकेल. त्यामुळे स्थानकावर जाऊन एसटी येईपर्यंत ताटकळत बसण्याची गरज नाही.
महामंडळाच्या ताफ्यातील 15 हजारपैकी 10 हजार बसेसला जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. उर्वरित पाच हजार बसेसना लवकरच जीपीएस यंत्रणा बसविण्याचे महामंडळाकडून नियोजन सुरू आहे. दरम्यान, जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केलेल्या बसेसचा महामंडळाकडून आढावा घेतला जात आहे.
यापूर्वी, बाहेरगावाहून कुणी येत असल्यास बसस्थानकावर निर्धारित वेळेपूर्वी येऊन वाट पाहण्यात तासन्तास ताटकळत बसावे लागत होते. मात्र, आता अॅपमुळे घरबसल्या लालपरीच्या लोकेशनची माहिती मिळणार असल्याने स्थानकावर ताटकळत बसण्याची गरज राहणार नाही.