राज्य लोकसेवा आयोग Pudhari Photo
नाशिक

MPSC Paper leaked case | पेपरफुटी प्रकरणातील 'ती' विद्यार्थिनी ताब्यात

एमपीएससी अधिकाऱ्याच्या घराचीही घेतली झडती

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार / नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पद परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात मुंबई पोलिसांचे पथक तिसऱ्यांदा नंदुरबार येथे दाखल झाले असून, सर्वाधिक चर्चेत आलेली विद्यार्थिनी ऋतुजा पाटीलला पथकाने ताब्यात घेतले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात कार्यरत असलेले अधिकारी गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगाने नंदुरबारमध्ये छाननी सुरू केली.

या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडे आहे. कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, शिक्षक अमृत पाटील आणि तक्रारदार विद्यार्थी गौरव पाटील यांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. नंदुरबार येथील विद्यार्थी गौरव पाटील आणि विद्यार्थिनी ऋतुजा पाटील यांच्यातील वादातून पेपरफुटीचे हे प्रकरण उघडकीस आल्याची माहिती प्रसारित झाल्यापासून ऋतुजा पाटील सध्या चर्चेत आहे. मुंबईच्या पथकाने याआधी नंदुरबार येथे दोन वेळेस येऊन चौकशी करण्याबरोबरच या सर्वांच्या घराची देखील तपासणी केली होती.

दरम्यान आता ३१ ऑगस्टच्या पहाटेपासून मुंबई गुन्हे शाखेचे तपास पथक सहा दिवसांत तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये दाखल झाले आहे. प्रकरणातील इतर संशयितांना बरोबर आणून चौकशी केली जात आहे. तपासासाठी ऋतुजा पाटीलला ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात कार्यरत असलेले गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगानेही तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. मराठे हे मूळचे नंदुरबारचे रहिवासी असून, ज्या कौटिल्य अकॅडमीमार्फत पेपरफुटी झाल्याचा आरोप प्रकरणात करण्यात आला आहे, त्याच अकॅडमीचे ते माजी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

पेपरफुटी प्रकरणातील संशयितांनी नंदुरबारमध्ये अलीकडच्या काळात केलेले आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता खरेदीदेखील चौकशीच्या रडारवर असल्याचे समजते. परिणामी नंदुरबार हे पेपरफुटी प्रकरणाचे चौकशीचे केंद्र होणार असे स्पष्ट दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT