नाशिक (पुढारी वृत्तसेवा):
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ संदर्भात आयोगाने महत्त्वाचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेच्या जाहिरातीनुसार काही पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबत स्पष्टीकरण दिले असून, संबंधित उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलमधील शैक्षणिक अर्हता सुधारित करण्याची संधी दिली आहे. आयोगाने १३ नोव्हेंबर रोजी हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे.
आयोगाने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २६ हजार ७३७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरतीसंदर्भात ६ नोव्हेंबर २०२६ रोजी पूर्वी शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये काही पदांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक स्पष्टता दिली आहे.
यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रोफाइलमधील शैक्षणिक अर्हता तपासून आवश्यक सुधारणा कराव्यात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये 'प्रोफाइल क्रिएशन विभागातील शैक्षणिक अर्हता सुधारित करून 'प्रोफाइल लॉक' करणे आवश्यक आहे.
त्यानंतर 'माय अकाउंटमधील पर्यायावर जाऊन 'कॉलिफिकेशन अपडेट' करावे. पुढे 'रिचेक एलिजिबिलिटी' या पर्यायावर क्लिक करून पात्रता तपासावी. त्यानंतर संबंधित संवर्गासाठी अर्ज करावयाच्या असल्यास 'अपप्लाय व सबमिट' या पर्यायाचा वापर करावा. या प्रक्रियेसाठी उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरायचे नाही.
तसेच पूर्वी केलेली अर्ज रद्द करण्याचीही गरज नाही. परीक्षेच्या मूळ जाहिरातीमधील अन्य अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी शुद्धीपत्रकातील सूचनानुसार शैक्षणिक माहिती अधयावत करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.