नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या अराजपत्रित (गट ब) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ रविवारी (दि. ४) शहरातील ५३ केंद्रांवर शांततेत पार पडली. १९ हजार ५८६ परीक्षार्थीपैकी १३ हजार ४८७ जणांनी ही परीक्षा दिली, तर ६ हजार ९९ परीक्षार्थीनी परीक्षेला दांडी मारली.
अराजपत्रित (गट ब) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही २१ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकींचा निकाल याच दिवशी जाहीर करण्यात येणार होता. परीक्षेत व्यत्यय येऊ नये, परीक्षार्थांना गर्दी-गोंगाटाचा त्रास होऊ नये आदी अडचणी लक्षात घेऊन या परीक्षेचे सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी ही परीक्षा ५३ केंद्रांवर घेण्यात आली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी परीक्षेचे नियोजन पाहिले. परीक्षेसाठी भरारी पथके तयार करण्यात आले होते. परीक्षा केंद्र परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ११ ते १२ या वेळेत झालेल्या या परीक्षेसाठी १९ हजार ५८६ उमेदवार परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १३ हजार ४८७ परीक्षार्थीनी प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा दिली. तर ६०९९ परीक्षार्थीनी परीक्षेला दांडी मारली. सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडल्या.