नाशिक : पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करून मराठी माणसाच्या अस्मितेवर, मराठी भाषेवर घाला घालण्याचा राज्यातील महायुती सरकारचा प्रयत्न शिवसेना (उबाठा) व मनसेच्या एकजुटीमुळे उधळला गेला.
आगामी काळातही अशीच एकजूट दाखवावी लागेल. नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेला कुंभमेळा प्रायव्हेट लिमिटेड होतोय. विरोधी पक्ष सोडाच पण सत्तेतील आमदारांनाही कुंभमेळ्याच्या नियोजनात विश्वासात घेतले जात नाही. आपला धार्मिक उत्सव यशस्वी होण्यासाठी सांघिक नियोजन करण्याची गरज असल्याने एककल्ली कारभाराविरोधात एकजुटीने लढा देऊ, असा निर्धार उबाठाचे खा. राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिल्याने महायुती सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्याने शिवसेना (उबाठा) व मनसेतर्फे येत्या ५ जुलै रोजी मुंबईत सर्वपक्षीय विजयी मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात खा. वाजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, माकपा पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द होणे हा सर्वपक्षीय एकजुटीचा, मराठी माणसाचा आणि ठाकरे ब्रॅण्डचा विजय आहे. या ताकदीसमोर महायुती सरकारला अखेर झुकावे लागले, असे खा. वाजे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, महिला आघाडीच्या सुजाता डेरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार, काँग्रेसचे शरद आहेर, माकपचे ॲड. तानाजी जायभावे आदी उपस्थित होते.
एकजुटीमुळेच महायुती सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे एकजुटीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येत्या ५ जुलै रोजी मुंबईत महामेळावा होत आहे. या मेळाव्यात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा. मराठी माणसाची ताकद काय असते हे विराट गर्दीच्या माध्यमातून सरकारला दाखवून द्या, असे आवाहनही खा. वाजे यांनी यावेळी केले.