नाशिक

MP Rajabhau Waje news | मी आज अन् उद्याही उबाठाचाच!

खा. राजाभाऊ वाजेंकडून ‘ऑपरेशन टायगर’चा इन्कार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : ऑपरेशन टायगरच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ होण्याच्या चर्चांना जोर आला असताना, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र शिंदे गटात प्रवेशाचा साफ इन्कार करीत या चर्चांना पूर्णविराम दिला. माझा ना कोणाशी संपर्क, ना कोणी मला संपर्क केला, असे नमूद करीत मी आज आणि उद्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार म्हणून काम करीत राहीन, असे स्पष्टीकरण वाजे यांनी दिले आहे.

सन २०२२ मध्ये राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमधील मुख्य घटक असलेल्या शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांचा गट फुटला. त्याबरोबरच १२ खासदारांनी शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत लोकसभेत स्वतंत्र गट निर्माण केला. आता चार वर्षांनंतर पुन्हा एकदा राज्यात उबाठा शिवसेना फुटीची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ला वेग दिला असून, ठाकरे गटाच्या आठ खासदारांना गळाला लावल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात ठाकरेंच्या खासदारांसोबत एका कंपनीच्या आवारात पहाटेपर्यंत बैठक घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

या बैठकीत ठाकरे गटाचे सहा खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर दोन खासदारांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदविल्याची चर्चा आहे. दरम्यान, खा. राजाभाऊ वाजे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे भूमिका स्पष्ट करताना शिंदे गटात प्रवेशाचा इन्कार करीत या चर्चांना पूर्णविराम दिला. कालपासून प्रसारमाध्यमे व समाज माध्यमांमध्ये ‘ऑपरेशन टायगर’बाबत चर्चा सुरू आहे. मी याबाबत फक्त एकच सांगू इच्छितो की, माझ्याशी कुणाचाही संपर्क झालेला नाही. मी कुणालाही संपर्क केलेला नाही. मी आजही आणि उद्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार म्हणून काम करत राहीन, असे स्पष्टीकरण देत खा. वाजे यांनी वावड्या पसरविणाऱ्यांना चपराक दिली आहे.

माझा कोणाशी संपर्क नाही

माझा ना कोणाशी संपर्क झाला, ना कोणी मला संपर्क केला. मी आजही आणि उद्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार म्हणून काम करीत राहीन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT