Nashik Mohadi Sarpanch pudhari photo
नाशिक

Nashik Mohadi Sarpanch post cancelled - अतिक्रमण भोवले; मोहाडी सरपंचांचे पद रद्द

मोजणी अहवालातून अतिक्रमण स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

जानोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा लक्ष्मण लहांगे यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्यामुळे अपर विभागीय आयुक्तांनी त्यांचे सरपंच आणि सदस्यत्व पद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सविता भाऊसाहेब पवार आणि किरण पंढरीनाथ नाईक यांनी आशा लहांगे यांच्या निवडीला आव्हान दिले होते. लहांगे यांनी मोहाडी येथील सरकारी जागेवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता. यापूर्वी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी १३ डिसेंबर २०२४ रोजी हा तक्रार अर्ज फेटाळला होता. या निकालावर नाराज होत तक्रारदारांनी अपर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान विभागीय आयुक्तांनी उपअधीक्षक भूमी अभिलेखमार्फत जागेची प्रत्यक्ष मोजणी करण्याचे आदेश दिले होते. २० ऑगस्ट २०२५ रोजी सादर करण्यात आलेल्या मोजणी अहवालानुसार घराचे अतिरिक्त बांधकाम असल्याचे स्पष्ट झाले. आशा लहांगे यांनी आपण पतीपासून विभक्त राहत असून, प्रवीण एकनाथ जाधव यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावर राहत असल्याचा दावा केला होता. परंतु, त्याबाबतचे सबळ पुरावे किंवा स्वतंत्र रेशनकार्ड त्या सादर करू शकल्या नाहीत.

अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत हा निर्णय दिला. या कायद्यानुसार सरकारी जागेवर अतिक्रमण करणारी व्यक्ती ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरते. अपर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द ठरवत कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल रद्दबातल ठरवण्यात आला आहे.

आशा लहांगे यांना उर्वरित कालावधीसाठी सरपंच आणि सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. पती किंवा कुटुंबातील सदस्यांनी केलेले अतिक्रमणही उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी पुरेसे असल्याचा निकष लावला गेला. या निकालामुळे मोहाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद आता रिक्त झाले असून, पुढील निवडणुकीची प्रक्रिया लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT